भारतीय हवामान खात्यातील कर्मचाऱ्यांचे 'मिशन प्रमोशन' आंदोलन

कर्मचारी संघटनांच्यावतीने 'जागतिक हवामान दिन' या दिवशी बहिष्कार टाकण्यात आला. 

Updated: Mar 23, 2022, 03:29 PM IST
भारतीय हवामान खात्यातील कर्मचाऱ्यांचे 'मिशन प्रमोशन' आंदोलन title=

मुंबई : भारतीय हवामान खात्यातील वर्गातील कर्मचारी संघटनेने एकत्र येऊन लढा दिला आहे.  ‘ब’ आणि ‘क’ कर्मचाऱ्यांना पदोन्नती व सेवा कार्यातील प्रगती संबधी निर्णय अनेक वर्ष रेंगाळत होता. या रेंगाळत ठेवण्याच्या धोरणामुळे सर्व कर्मचारी संघटना एकत्र येऊन लढा देत आहेत. याचाच एक भाग म्हणून कर्मचारी संघटनांच्यावतीने 'जागतिक हवामान दिन' या दिवसाचं अवचित्यसाधून बहिष्कार टाकण्यात आला. 

भारतीय हवामान खात्यातील वर्ग 'अ ' चे अधिकारी नेहमीच आपल्या पदाचा गैरवापर करून वर्ग 'ब' आणि 'क' कर्मचाऱ्यांचे खच्चीकरण करत आले आहेत.

सन २००६ आधी  वर्ग ‘ब’  चे अधिकारी पदोन्नती मिळवत वर्ग ‘अ’  अधिकारी बनत होते. परंतू  २००६ सालापासून वर्ग ‘अ’ अधिकाऱ्यांनी वर्ग ‘ब’ अधिकाऱ्यांच्या बढतीचे आदेश काढण्यासंबंधी  चालढकल केली.

२०१० साली  'ब' वर्ग अधिकाऱ्याचे   वर्ग 'अ'  होण्याचे मार्ग पूर्णपणे  बंद करण्यात आले.   

‘ब’ आणि  ‘क’ वर्ग कर्मचाऱ्यांच्या पुनर्रचना प्रक्रियेची त्यांनी थट्टाच मांडली आहे. नियुक्ती नियमांच्या मसुद्याच्या आधारे वर्ग ‘ब’ अधिका-यांची नवनिर्मित वर्ग ‘अ’ संवर्गात बढती करण्याची संमत्ती असतानाही केवळ नियुक्ती नियमांचे कारण पुढे करून या बढत्यांना विलंब करीत आले आहेत.

यासाठी CAT चे निर्णय स्विकारले नाहीत किंवा त्यावर स्थगिती देखिल आणली नाही. भारत सरकारने हवामानशास्त्रात अधिकाधिक संशोधन व्हावे या उदात्त हेतूने हवामानशास्त्रज्ञ ही  ‘अ’ वर्ग पदे निर्माण केली.

त्यावेळेस MFCS च्या अंतर्गत ‘शास्त्रज्ञ’ पदा करीता पुढील बढतीत ही बाब स्पष्ट केली होती की, त्यांनी प्रशासकीय कामात गुंतू नये.

परंतु ते स्वत:ला सर्व प्रकारच्या प्रशासकीय कामात गुंतवून सरकारची फसवणूक करत आहेत  आणि 'ब' वर्गातून पदोन्नती द्वारे वर्ग ‘अ’ तंत्र प्रशासकीय पदे भरण्यास देखिल तयार नाहीत. 

हवामान शास्त्र विभागाचा संपूर्ण भार  हा ‘ब’ व ‘क’ वर्गा मधील कर्मचारी २४x७x३६५ अव्याहतपणे वाहून आवश्यक अशी महत्वाची हवामानविषयक माहिती तयार करतात.

जी संशोधन तसेच हवामानाच्या अंदाजाकरीता अत्यावश्यक असते. परंतु बढती व प्रगतिच्या सर्व संधी फक्त आणि फ़क्त वर्ग ‘अ’ ला बहाल केल्या जातात. 

वर्ग 'अ ' चे अधिकारी २४x७ कार्यरत असलेल्या ठिकाणी अगदी आपातकालीन हवामान परिस्थितीत देखिल काम करण्यास अनुत्सुक असतात. 

आंतराष्ट्रीय विमानतळासहीत सर्व विमानतळे वर्ग ‘अ’  अधिका-यांच्या  २४x७  सेवांशिवाय चालू आहेत. 

भारतीय हवामानशास्त्र विभागातील प्रशासकीय, कार्यशाळा तसेच बहु कार्मिक कर्मचारी यांच्या व्यथा यापेक्षा वेगळ्या नाही आहेत. हे सर्व वर्ग ‘ब’ आणि वर्ग ‘क’ कर्मचारी जवळजवळ  २७ वर्षाच्या केंद्र सरकारी सेवेनंतरही त्यांच्या पहिल्यावहिल्या बढतीच्या प्रतिक्षेत आहेत.

त्याच वेळी २०२० ते २०२२ च्या जागतिक महामारीच्या संकटसमयी देखिल स्वत:च्या पदोन्नतीची निश्चिती करून  वर्ग ‘अ’ अधिका-यांनी त्यांच्या असंवेदनशीलतेची व दांभिक वृत्तीची परिसीमा गाठली. 

वर्ग ‘अ’ अधिका-यांनी त्यांच्या निम्नस्तरीय वर्गाच्या उत्कर्षाकरीता अग्रणी असायला हवे होते परंतु त्यांच्या वसाहतवादी वृत्तीमुळे सर्व कर्मचारी संघटनांना त्यांच्या विरुद्ध दंड थोपटावे लागले. 

अगदी मंत्र्यांपासून ते पंतप्रधान कार्यालय ते संसदेपर्यंत आम्ही आमचे प्रश्न मांडण्याचे कसोशिने अनेक प्रयत्न केले परंतु आमच्या व्यथा कुणालाच ऐकू येत नाहीत.

त्यामुळेच नाईलाजास्तव आम्हाला हे आंदोलन करावे लागत आहे. निर्णय मिळेपर्यंत हे आंदोलन चालूच रहाणार आहे.