मुंबईतली सर्व कोविड सेंटर्स लवकरच सुरू होणार

कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड सेंटर्स पुन्हा सुरू होणार आहेत.

Updated: Feb 24, 2021, 10:29 PM IST
मुंबईतली सर्व कोविड सेंटर्स लवकरच सुरू होणार title=

मुंबई : मुंबईतली सर्व कोविड सेंटर्स लवकरच सुरू होणार आहेत. कोरोना रूग्णांची संख्या वाढत असल्याने कोविड सेंटर्स पुन्हा सुरू होणार आहेत. पालिका आयुकांनी एका आठवड्याच्या कालावधीत ही सेंटर्स सुरू करण्याचे आदेश दिलेत. कोरोना केंद्रांत ७० हजार ५१८ खाटा उपलब्ध आहेत. यांपैकी सध्या १३ हजार १३६ खाटांवर रुग्ण उपचार घेत आहेत; तर ९७५७ खाटा राखीव आहेत. नोव्हेंबर महिन्यानंतर रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे बहुतांश कोविड काळजी केंद्रे बंद करण्यात आली होती; तर सात जम्बो कोविड केंद्रे आणि प्रत्येक विभागात एक असे एकूण २४ कोविड केंद्रे ३१ मार्च २०२१ पर्यंत सुरू ठेवण्यात येणार होती.

कोरोनाच्या लाट पुन्हा येत असल्याने सरकारच्या चिंता वाढल्या आहेत. कोरोनाचा उद्रेक पुन्हा एकदा वाढला आहे. धक्कादायक बाब म्हणजे आता लहान मुलांमध्ये देखील कोरोनाचा संसर्ग वाढत आहेत. अनेक लहान मुलं कोरोना पॉझिटिव्ह असतात. मात्र त्यांच्यात कोरोनाची लक्षणं आढळत नाहीत. कारण त्यांची प्रतिकारशक्ती... मात्र ही मुलं कोरोना व्हायरसचा कॅरिअर बनू शकतात. त्यामुळं घराबाहेर पडताना लहान मुलांच्याही तोंडाला मास्क असलाच पाहिजे, असा सल्ला डॉक्टर देतात.

कोरोना अजूनही संपलेला नाही. लस आलेली असली तरी मास्क लावा, हात धुवा आणि सुरक्षित अंतर ठेवा, असं आवाहन प्रशासनाकडून केलं जातं आहे. जानेवारीच्या सुरूवातीला घसरणीला लागलेल्या कोरोनानं फेब्रुवारी मध्यापासून पुन्हा डोकं वर काढलं. निर्बंधांमध्ये आलेली शिथिलता हे कोरोनावाढीचं कारण मानलं जातं आहे. लोकं बेजबाबदारपणाने बाहेर फिरत आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढत आहे.