मुंबई : अहमदाबाद-मुंबई बुलेट ट्रेनची काय गरज होती?, असा सवाल अजित पवारांनी केला आहे. रेल्वेच्या एलफिस्टन-परळ ब्रीजवर झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर, अजित पवारांनी हा सवाल केला आहे. दरम्यान, सामान्य प्रवाशांनी देखील आम्हाला बुलेट ट्रेन नाही तर रेल्वेच्या पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचं बोलून दाखवलं आहे.
रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी या घटनेची उच्चस्तरीय चौकशी केली जाणार असल्याचं म्हटलं आहे. सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, रेल्वेमंत्र्यांवर खटला चालवला जावा, अशी मागणी शिवसेना नेते संजय राऊत यांनी केली आहे. तर शिवसेनेचे आमदार अजय चौधरी यांनी देखील सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.