मुंबई : आपल्या रोखठोक बोलण्याबद्दल राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा भलतेच प्रसिद्ध आहेत. विरोधकांच्या आरोपांना ते कधी संयम राखून उत्तर देतात. तर, संधी मिळते तेव्हा त्या आरोपांचे उट्टेहि काढतात. हिवाळी अधिवेशनाच्या आजच्या अखेरच्या दिवशी त्यांना अशीच संधी मिळाली आणि त्यांनी आमदारांची कार्यशाळाच घेतली.
हिवाळी अधिवेशनात विरोधकांनी पायऱ्यांवर आंदोलन केले होते. यावेळी भाजप आमदार नितेश राणे यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना पाहून म्याव म्याव असा आवाज काढला होता. त्यावरून सभागृहात शिवसेना आमदारांनी नितेश राणे यांच्या निलंबनाची मागणी केली. तर, त्याला विरोधी पक्षाने विरोध दर्शविला होता. यावेळी झालेल्या चर्चेअंती विधिमंडळ आणि आवारामध्ये सदस्यांच्या वर्तणुकीबाबत आचारसंहिता असावी अशी भूमिका सभागृहाने घेतली.
आज अधिवेशनाच्या अखेरच्या दिवशी विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या दालनात यासंदर्भात बैठक घेण्यात आली. या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार सभागृहात सभासदांच्या वर्तनाबाबतची नियमावली जाहीर केली गेली. यावेळी अजित पवारांनी सर्व पक्षीय आमदारांना कानपिचक्या दिल्या.
काही आमदारांना तारतम्य राहिलं नाही. त्यांनी नमस्कार करणं सोडून दिलंय. आपल्याला सगळं समजतंय असं त्यांना वाटते. दादांचा हा पवित्रा पाहून अनेकांचे चेहरे पाहण्यासारखे झाले होते.
“आचारसंहितेचे पालन करणे हे सभागृहाच्या प्रत्येक सदस्याचे कर्तव्य आहे. राज्यातला प्रत्येक जण विधीमंडळातल्या प्रत्येकाच्या वर्तनाकडे बारकाईने लक्ष ठेवून असतो. त्यामुळे प्रत्येकाने जबाबदारीने वागलं पाहिजे. कुत्री, मांजरं, कोंबड्यांचं आपण प्रतिनिधित्व करत नाही याचं भान ठेवा. आपला माणूस तिथे जाऊन असे आवाज काढतो, टवाळी करतो यावर मतदारांना काय वाटेल”, असा टोला त्यांनी नितेश राणे यांना लगावला.
आदर्श वर्तन आणि आचारसंहितेचे पालन होण्याबाबत पक्ष बाजूला ठेवून चर्चा करण्यात आली. आम्ही ३० वर्षापूर्वी आलो त्यावेळी लाईव्ह प्रक्षेपण होत नव्हतं. विधिमंडळ आवारात असलेल्या माध्यमांच्या कक्षातून आता प्रक्षेपण होत आहे. त्यामुळे सदस्यांचे वर्तन विधिमंडळाला शोभेल तसेच इतर कोणाचा अपमान, अवमान होणार नाही असे ठेवले पाहिजे, असे ते म्हणाले.