मला ईडीची नोटीस आलेली नाही - अजित पवार

 अजित पवार यांनी यावेळी ईडी, शिवसेनेच्या मुद्यावर रोखठोक मते मांडलीत.

Updated: Oct 11, 2019, 06:29 PM IST
मला ईडीची नोटीस आलेली नाही - अजित पवार title=

मुंबई : महाराष्ट्र राज्य सहकारी बॅंक कर्ज वाटप प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याविरोधात ईडीने गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर राज्याच्या राजकाणात मोठी चर्चा सुरु झाली. अजित पवार यांच्या अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात होते. मात्र, अजित पवार यांनी आपल्याला कोणतीही नोटीस आलेली नाही, असे स्पष्ट केले आहे. शिखर बँक घोटाळ्याप्रकरणी अजून ईडीची नोटीस आली नसल्याचे अजित पवार यांनी सांगितले. 'झी २४ तास'चे कार्यकारी संपादक आशिष जाधव यांनी घेलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी याबाबत भाष्य केले. अजित पवार यांनी यावेळी ईडी, शिवसेनेच्या मुद्यावर रोखठोक मते मांडलीत.

आज शिवसेना आणि भाजपचे नेते कोणताही मुद्दा काढून लक्ष दुसरीकडे वळवत आहेत. यांच्या सत्ताकाळात बेरोजगारी वाढली आहे. मंदी आलेली आहे. १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. त्याचे उत्तर यांच्याकडे नाही. केवळ पवारांवर टीका करुन आणि लक्ष विचलीत करुन दिशाभूल करण्याचे काम हे युतीचे सरकार करत आहे. यांनी विकास केला नाही. त्यामुळे त्यांना उत्तर देण्यासाठी मुद्दे नाहीत. राज्यावर पाच लाख कोटींचे कर्ज झाले आहे. त्याचे उत्तर द्या. आता शिवसेनेवाले म्हणतायेत एक रुपयात आरोग्य तपासणी करु, १० रुपयांत थाळी देऊ. मग पाच वर्षे  कोणी हात बांधले होते का तुमचे, असा थेट हल्लाबोल अजित पवार यांनी यावेळी केला.

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेतील २५ हजार कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील जवळपास सर्वपक्षीय नेत्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर ७० जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यात अजित पवार यांचे नाव आहे. मात्र, अजित पवार यांना ईडीची नोटीस गेली नसल्याचे त्यांनीच सांगितले. त्यामुळे गुन्हा नोंदवून चौकशी का होत नाही, याची चर्चा सुरु झाली आहे. दरम्यान, या बॅंकेची एवढी उलाढाल नाही. मग एवढ्या कोटीचे कर्ज वाटप कसे होणार, असा सवाल त्यांना याआधी उपस्थित केला होता.

अजित पवार यांच्यासह हसन मुश्रीफ, राजेंद्र शिंगणे, काँग्रेसचे मधुकर चव्हाण, जयंतराव आवळे, दिलीप देशमुख, शेकापचे जयंत पाटील यांच्यासह ७० जणांच्या विरोधात एमआरए पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २२ ऑगस्टला न्यायालयाने पाच दिवसात गुन्हा दाखल करण्याचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली होती. पण आता ईडीने देखील या प्रकरणात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे या नेत्यांच्या अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.