शिवसेनेच्या अयोध्या आणि दुष्काळ दौऱ्यावर अजित पवारांची टीका

अजित पवारांची शिवसेनेवर जोरदार टीका

Updated: Jun 10, 2019, 05:45 PM IST
शिवसेनेच्या अयोध्या आणि दुष्काळ दौऱ्यावर अजित पवारांची टीका title=

मुंबई : सत्ताधारी फक्त निवडणुकीतच गुंतल्याचं चित्रं आहे. दुष्काळाबाबत सत्ताधाऱ्यांना ठोस भूमिका घेता आली नाही अशी टीका अजित पवारांनी केली. आपण सत्ताधारी आहोत की विरोधक या संभ्रमात शिवसेना असल्याचं देखील त्यांनी म्हटलं. शिवसेनेच्या अयोध्या दौऱ्यावरही टीका करत अजित पवारांनी म्हटलं की, विकासाचा मुद्दा राहिला नाही. त्यामुळे धार्मिक, भावनिक मुद्दा उभा करुन जनाधार आपल्या बाजुनं करायचा प्रयत्न करायचा हे प्रकार सुरु आहेत.

अजित पवारांनी म्हटलं की, नरेंद्र मोदींची लाट देशात होती. मोदींचं सरकार बहुमतानं आलं. मात्र, निवडणूका येतात-जातात, कार्यकर्त्यांना आता जोमानं कामाला लागण्याचं आवाहन आहे. आता महाराष्ट्राच्या विधानसभेवर लक्ष केंद्रीत करायचं आहे. समविचारी पक्षांना सोबत घ्यायचं आहे. समविचारी लोकांचं सरकार आणण्याचे सगळे प्रयत्न करणार आहोत.

'सध्या सत्ताधाऱ्यांमध्ये विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण अशा चर्चा सुरु आहेत. त्यांना चर्चा करु द्या. आम्हांला वाटतं मुख्यमंत्री आघाडीचाच झाला पाहिजे.' असं देखील अजित पवारांनी म्हटलं.

पुढे त्यांनी म्हटलं की, 'पाऊस सुरु झाला आहे, वातावरण बदलतंय. दुष्काळाची परिस्थिती कायम आहे. बेरोजगारी वाढते आहे. सत्ताधा-यांना ठोस भूमिका घेता आली नाही. उन्हाळ्यातले परदेश दौरे करुन झालेत आता पावसाळा सुरु होतो आहे आणि आता दुष्काळ दौरे करत आहेत. उपमुख्यमंत्रीपद कुणाला द्यावं हा शिवसेनेचा अंतर्गत प्रश्न. कोण उपमुख्यमंत्री होईल हे महाराष्ट्रही पाहिल आणि आम्हीही पाहुच.'