मंत्रालयासमोर वृद्ध महिलेचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न

पुन्हा मंत्रालयासमोर विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 

Updated: Feb 16, 2018, 07:56 PM IST
मंत्रालयासमोर वृद्ध महिलेचा विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न  title=

मुंबई : जमीन बळकावल्याप्रकरणी सरकारकडे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या नाशिक जिल्ह्यातील शकुंतला झालटे या ६५ वर्षाच्या वृद्ध महिलेनं आज मंत्रालयासमोर विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. 

काय आहे प्रकरण?

पोलिसांनी तात्काळ या महिलेला रुग्णालयात हलवले असून तिची प्रकृती आता व्यवस्थित आहे. नाशिक जिल्ह्य़ातील चांदवड तालुक्यातील वडगाव पंगू गावातील ही वृद्ध महिला रहिवाशी आहे. शकुंतला यांची जमीन त्यांच्याच भावकीतील लोकांनी बळकावली आहे. याबाबत एसडीओ, मंडल अधिकारी, तलाठी, अप्पर जिल्हाधिकारी यांच्याकडे सुनावणी होऊनही न्याय मिळाला नाही. 

मंत्रालयात तक्रार

मंत्रालयातही याबाबत त्यांनी तक्रार केली होती. मात्र न्याय मिळत नसल्याने त्रस्त झालेल्या या महिलेने आत्मदहन करण्याचा इशारा देणारे पत्र आज सकाळी मंत्रालयात दिले होते. दुपारी मंत्रालयासमोर त्यांनी विष प्राशन करत असतानाच पोलीसांनी तात्काळ हस्तक्षेप करून सदर महिलेला रुग्णालयात दाखल केलं. राज्यमंत्री प्रविण पोटे यांनी रुग्णालयात जाऊ शकुंतला यांची विचारपूस केली आणि त्यांची तक्रारही ऐकून घेतली. या प्रकरणात न्याय देण्याचं आश्वासन पोटे यांनी महिलेला दिलं आहे.