टोमॅटो आणि कांद्याने ग्राहकांना रडवलं, आता साखरेचा गोडवाही कमी होणार

पावसानं महाराष्ट्राकडं पाठ फिरवलीय. त्याचा फटका साखर उत्पादनाला देखील बसणार आहे.  यंदाच्या वर्षी साखरेचं उत्पादन घटण्याची शक्यता वर्तवली जातेय. त्यातच साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे.

Updated: Aug 24, 2023, 05:14 PM IST
टोमॅटो आणि कांद्याने ग्राहकांना रडवलं, आता साखरेचा गोडवाही कमी होणार  title=

Sugar Production Rain Effect : टोमॅटो (Tomato) आणि कांद्यानं (Onion) ग्राहकांना रडवलं असताना, आता साखरेचा गोडवाही कमी होण्याची शक्यता आहे. कांद्यापाठोपाठ साखरेच्या निर्यातीवरही बंदी येण्याची शक्यता आहे. ऊसाची लागवड जिथं प्रामुख्यानं होतं, त्या महाराष्ट्र आणि कर्नाटकात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 50 टक्के पाऊस झालाय. त्याचा फटका ऊस लागवडीला बसणाराय. पावसाअभावी ऊस कमी झाला तर साखरेचं उत्पादन घटण्याची शक्यता आहे. तसं झाल्यास ग्राहकांचं तोंड कडू होईलच. शिवाय साखर कारखान्यांचं अर्थकारणच बिघडून जाणाराय. 

साखर होणार कडू? 
यंदा 14 लाख 37 हजार हेक्टरवर ऊसाची लागवड करण्यात आली. मात्र ऊस पट्ट्यात समाधानकारक पाऊसच झालेला नाही. गेल्यावर्षी महाराष्ट्रात 1 हजार 52 लाख टन ऊसाचं गाळप झालं होतं. मात्र यंदा केवळ 970 लाख टन ऊस गाळप होण्याचा अंदाज आहे. गेल्यावर्षी 105 लाख 31 हजार टन साखर उत्पादन झालं होतं. तर यंदा सुमारे 94 लाख टन साखर उत्पादन हाती येईल. त्यामुळं साखर कारखान्यांना (Sugar Factory) आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे

साखर उत्पादकांना फटका
पावसामुळे देशातील साखर उत्पादनात घट झालीय. त्यामुळे साखर उत्पादनाला फटका बसलाय. साखरेचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारकडून साखर निर्यातीवर बंदी घातली जाण्याची शक्यता आहे. मात्र, सध्या तरी निर्यातबंदीची शक्यता कमी आहे. सरकार नवीन हंगामात उत्पादन साठा पाहूनच निर्यातबंदीचा विचार करू शकतं. सध्या सरकार साखरेच्या निर्यातबंदीबाबत कोणताही निर्णय घेण्याच्या विचारात नाही. 

2016 मध्ये केंद्र सरकारनं साखरेवर 20 टक्के निर्यातशुल्क लागू केलं होतं. भारतानं आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्या प्रमाणावर साखर निर्यात केली आहे. मात्र या वर्षी पावसाने ओढ दिल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि साखर कारखान्यांसमोर अडचण निर्माण झाली आहे. 

गेल्या काही वर्षांत अनेक मोठ्या साखर कारखान्यांनी गाळपक्षमता वाढवलीय. मात्र ऊसतोडणी वेळेवर होत नसल्यानं गेल्या हंगामात अनेक कारखान्यांना ऊसच उपलब्ध झाला नाही. यंदा पावसानं ओढ दिल्यानं ऊसाची उपलब्धता हा साखर कारखान्यांसाठी मोठा गहन प्रश्न बनणाराय. केवळ कारखानेच नव्हे तर साखरेअभावी ग्राहकांच्या तोंडाची चव देखील बिघडणार आहे. देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेची गरज भागवण्यासाठी तब्बल 7 वर्षांनी साखरेच्या निर्यातीवरही (Ban Sugar Exports) बंदी येण्याची शक्यता आहे. त्यामुळं टोमॅटो आणि कांद्यापाठोपाठ साखरही टेन्शन वाढवणाराय.