अमृता फडणवीस यांचाही सोशल मीडियाला रामराम?

कधी कधी लहानसे निर्णयही आपले आयुष्य बदलणारे ठरतात.

Updated: Mar 3, 2020, 08:21 AM IST
अमृता फडणवीस यांचाही सोशल मीडियाला रामराम? title=

मुंबई: गेल्या काही दिवसांपासून ट्विटरवर शिवसेनेशी दोन हात करणाऱ्या अमृता फडणवीस यांच्याकडूनही सोशल मीडियाला रामराम केला जाण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री अचानकपणे ट्विट करून सोशल मीडियावरून एक्झिट घेण्याचा मानस व्यक्त केला. यानंतर अमृता फडणवीस यांनी ट्विट करून आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या.  

कधी कधी लहानसे निर्णयही आपले आयुष्य बदलणारे ठरतात. मी माझ्या नेत्याच्या पावलावर पाऊल ठेवेन, अशा आशयाचे ट्विट वअमृता फडणवीस यांनी केले. त्यामुळे आता मोदींपाठोपाठ अमृता फडणवीसही सोशल मीडियाचा त्याग करतील, अशी चर्चा सुरु झाली आहे.

सोशल मीडिया नको, द्वेष सोडा, राहुल गांधींचा मोदींना टोला

दरम्यान, आता सगळ्यांनाच पंतप्रधान नरेंद्र मोदी काय करणार, याची उत्सुकता लागली आहे. नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री ट्विट करून सोशल मीडियाला कायमचा रामराम करण्याची इच्छा बोलून दाखवली. फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि यूट्यूब ही सोशल मीडिया अकाउंट येत्या रविवारपासून बंद करण्याचा माझा विचार आहे. लवकरच मी तुम्हाला याबद्दल कळवेन, असे मोदींनी ट्विटमध्ये म्हटले होते. 

पंतप्रधान मोदींनी सोशल मीडिया सोडण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. नरेंद्र मोदी सोशल मीडियावर सर्वाधिक फॉलोअर्स असलेल्या जगातील मोजक्या नेत्यांपैकी एक आहेत. मोदींचे ट्विटरवर ५३.३ मिलिअन फॉलोअर्स आहेत. फेसबुकवर ४४, ५९७, ३१७ जण त्यांना फॉलो करतात. तर इन्स्टाग्रामवर त्यांचे ३५.२ मिलिअन फॉलोअर्स आहेत.