मोठा दिलासा! आजपासून मेट्रोही मुंबईकरांच्या सेवेत

आता प्रतीक्षा मुंबई लोकल सेवा पूर्ववत होण्याची   

Updated: Oct 19, 2020, 07:12 AM IST
मोठा दिलासा! आजपासून मेट्रोही मुंबईकरांच्या सेवेत  title=

मुंबई : कोरोना व्हायरसचा coronavirus वाढता प्रादुर्भाव पाहता त्यात पार्श्वभूमीवर जवळपास ६ महिन्यांहून अधिक काळासाठी ठप्प असणारी मेट्रो सेवा पुन्हा एकदा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होत आहे. मार्च महिन्यामध्ये देशव्यापी लॉकडाऊनची घोषणा केल्यापासून ही सेवा बंदच होती. ज्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या नियमावलीसह Mumbai Metro मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत रुजू झाली आहे. 

मागील आठवड्यामध्येच महाराष्ट्र शासनानं मुंबईतील मेट्रो सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी हिरवा कंदील दाखवला होता. ज्यानंतर सर्व पाहणीनंतर सोमवारपासून ही मेट्रो मुंबईकरांच्या सेवेत आली. सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास पहिली मेट्रो रुळावर येणार असल्याची अधिकृत माहिती मुंबई मेट्रो प्रा. लि.कडून देण्यात आली.

सकाळी ८.३० ते रात्री ८.३० वाजेपर्यंत ही सेवा घाटकोपर- वर्सोवा मार्गावर सुरु राहणार आहे. पण, यावेळी मात्र अनेक प्रतिबंधात्मक उपायांचं काटेरोरपणे पालन केलं जाणार आहे. यापूर्वी मेट्रोतून एका वेळी  १२०० ते १३०० प्रवाशांना प्रवास करता येत होता. पण, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा आकडा आता कमी करुन सुरक्षेच्या कारणास्तव २५० ते ३०० प्रवाशांवर आणण्यात आला आहे. त्याशिवाय मेट्रोच्या आतील तापमान हे २५-२७ अंशांवर ठेवण्यात येणार आहे. या प्रवासादरम्यान प्रवाशांनी ई तिकीट, स्मार्ट कार्ड किंवा क्यूआर कोडवर आधारित तिकीटांचा वापर करावा असं सांगत प्लास्टीक टोकन देण्यात येणाप नसल्याचं सांगण्यात आलं आहे. 

प्रवाशांसाठी मेट्रो सेवेतर्फे आखण्यात आलेले नियम ....

- तब्येत ठीक नसल्यास प्रवास टाळा. 

- ६५ वर्षांवरील आणि १० वर्षांखालील प्रवाशांनी गरज असेल, तरच प्रवास करावा. 

- गर्दीचा प्रवास टाळा. 

- निर्धारित प्रवेशद्वारांचाच वापर करा. 

- प्रत्येक प्रवेशद्वारावर थर्मल स्क्रिनींग करुन घ्या. 

 

- मेट्रोमध्ये येताना, स्थानकावर आणि मेट्रोच्या आत जात असताना सोशल डिस्टन्सिंगचं पालन करा. 

- प्रवास करताना जास्तीचं सामान आणि धातूचं सामान सोबत आणणं टाळा. 

- स्मार्ट कार्ड, क्यूआर कोड, मोबाईल तिकीटांचा वापर करा. 

- आरोग्य सेतू ऍपचा वापर करणं कधीही उत्तम.