कृष्णात पाटील, झी मीडिया, मुंबई : सचिन अहिर राष्ट्रवादी काँग्रेसचा मुंबईमधला चेहरा मानले जात होते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी शिवसेनेत जाणं हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जातो आहे. तर मुंबईत शिवसेनेचं बळ त्यामुळे वाढणार आहे.
सचिन अहिर यांनी घड्याळ सोडून शिवबंधन बांधलं आहे. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत सचिन अहिर यांनी सहकुटुंब आणि कार्यकर्त्यांसह शिवसेनेत प्रवेश केला. पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारण्याची अहिर यांची तयारी आहे.
आदित्य ठाकरे वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. मुख्य विरोधक सचिन अहिरच शिवसेनेत आल्यानं आदित्य ठाकरेंचा विजय सोपा होईल.
भाजपाची मुंबईतली वाढती ताकद पाहता शिवसेनेलाही मुंबईतील ताकद वाढविण्यासाठी सचिन अहिर यांचा उपयोग होईल. राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षच आणि पक्षाचा मुंबईचा चेहराच शिवसेनेत गेल्यानं विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेचं मनोबल वाढण्यास मदत होईल.
वरळीऐवजी सचिन अहिर यांना भायखळा मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. अरूण गवळीचा भाचा असल्यानं गवळींची 'अभासे' भायखळ्यात उमेदवार न देता सचिन अहिर यांना मदत करू शकते.
शिवसेना अहिर यांना विधानपरिषदेवरही पाठवू शकते. आगामी काळात सचिन अहिर यांना मानणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक शिवसेनेत येण्याची शक्यता आहे. सचिन अहिरांच्या शिवसेना पक्षप्रवेशानंतर अजित पवारांनी टीका केली.
२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत सचिन अहिर यांचा पराभव झाला होता. मुंबईत राष्ट्रवादीचा एकही आमदार नाही, पक्षाचे सुरूवातीपासून मुंबईकडे दुर्लक्ष, आगामी निवडणुकीबद्दल ठोस धोरण नाही, राष्ट्रवादीच्या तिकीटावर विजयाची खात्री नाही या सगळ्या कारणांमुळे सचिन अहिरांनी राष्ट्रवादीला रामराम केला आहे. याचा शिवसेना आणि सचिन अहिर यांना नेमका काय फायदा होतो, ते विधानसभा निवडणुकीतच कळणार आहे.