Sameer Wankhede Row : आर्यन खान (Aryan khan) प्रकरणी अडचणींच्या फेऱ्यात अडकलेले NCB चे तत्कालीन Zonal Director समीर वानखेडे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरत आहेत. आर्यन खानची ड्रग्ज प्रकरणातून सुटका करण्यासाठी 25 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला. ज्यानंतर अधिकारी पदावर असूनही वानखेडे यांना सीबीआय चौकसीला सामोरं जावं लागलं. वानखेडे यांच्यामागे असणारी संकटं राही केल्या थांबण्याचं नाव घेत नसतानाच त्यांच्या आधारासाठी एक खास व्यक्ती उभी राहिली आहे.
सोशल मीडियावर सक्रीय असणाऱ्या क्रांती रेडकरनं वेळोवेळी पतीची साथ दिल्याचं पाहायला मिळालं आहे. इतकंच नव्हे, तर काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर तिनं माध्यमांसमोर येत भाष्यही केलं आहे. आता पुन्हा एकदा हीच क्रांती रेडकर पतीच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहत त्यांचा आधार होताना दिसत आहे.
क्रांतीनं नुकताच सोशल मीडियावर आणखी एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओच्या निमित्तानं समीर वानखेडे यांच्या कार्यक्षेत्रामध्ये डोकावण्याची संधी मिळत आहे. 'तुझा वेळ आणि ताकद तुला जे आवडतं ते करण्यात म्हणजेच आपल्या देशाची सेवा करण्यात खर्ची घातलं असतंस तर... ' असं म्हणत सध्या पतीमागे असणारी आरोपांची साडेसाती आणि आव्हानांबद्दल क्रांतीनं खंत व्यक्त केली.
तिनं शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये समीर वानखेडे यांनी आतापर्यंत केलेल्या कारवाया आणि त्यांच्या कामाची छाप पाहता येत आहे. राष्ट्रसर्वतोपरी असा हॅशटॅगही तिनं या व्हिडीओला जोडला आहे. या व्हिडीओच्या निमित्तानं समीर वानखेडे यांची काम करण्याची पद्धतही नकळत सर्वांपुढे येत आहे.
दरम्यान, हे संपूर्ण प्रकरण अद्यापही निकाली निघालेलं नाही. पण, क्रांती मात्र सातत्यानं पतीची बाजू सोशल मीडियावर उचलून धरताना दिसत आहे. एखाद्या व्हिडीओच्या माध्यमातून नाव न घेता विरोधकांवर ती निशाणाही साधताना दिसत आहे.