Mhada Lottery 2023: लाखोंचा पगार, अत्यल्प उत्पन्न गटात आमदार; म्हाडाचा उफराटा कारभार

Mhada Lottery 2023: म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या घरांची प्रतीक्षा अखेर संपुष्टात आलीय. मुंबईतील 4 हजार 83 घरांसाठी आज जाहिरात प्रसिद्ध झाली. या लॉटरीत आमदारांसाठीही राखीव कोटा ठेवण्यात आला आहे. 

वनिता कांबळे | Updated: May 25, 2023, 10:43 AM IST
Mhada Lottery 2023: लाखोंचा पगार, अत्यल्प उत्पन्न गटात आमदार; म्हाडाचा उफराटा कारभार  title=

Mhada Lottery 2023 : सर्वसामान्यांसाठी घरं बांधणा-या म्हाडानं चक्क आमदारांसाठी मुंबईत घरांची लॉटरी काढली आहे. तीही अत्यल्प उत्पन्न गटातून. मुंबई महानगर क्षेत्रात सर्वसामान्यांना परवडणारी घरं बांधून देणारी सरकारी संस्था. मात्र याच म्हाडानं महिना अडीच लाख वेतन घेणा-या आमदारांसाठी घरं राखीव ठेवली आहेत. एवढंच नव्हे तर लाखोंचा पगार घेणा-या आमदारांना चक्क गरिबांसाठी असलेल्या अत्यल्प उत्पन्न गटात घरं राखीव ठवण्यात आली आहेत. लाखोंचा पगार घेणारे आमदार अत्यल्प उत्पन्न गटात कसे काय बसतात? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. गरिबांची घरघर सुरु असताना आमदारांना मात्र राखीव घर ठेवल्याने म्हाडा अधिका-यांच्या उफराटा कारभारावर देखील टीका होत आहे (Mhada Lottery 2023).  

म्हाडा लॉटरीत आमदारांसाठी राखीव कोटा

म्हाडानं नुकतीच 4 हजार घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. विविध गटांसाठी म्हाडानं घरं राखीव ठेवली आहेत. त्यात विविध जाती, स्वातंत्र्य सैनिक, पत्रकार, माजी सैनिक, अंध-अपंग अशा कॅटेगरी आहेत. मात्र, त्यासोबतच एक राखीव कॅटेगरी आहे ती म्हणजे आजी-माजी आमदार-खासदारांची. 

म्हाडाचं आमदार प्रेम! 

म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या सोडतीत एकूण 4083 घरांचा समावेश आहे. यात अत्यल्प उत्पन्न गटासाठी 2790 घरं राखीव आहेत. मुंबईतील गोरेगावमध्ये पंतप्रधान आवास योजनेतून 1947 घरं आहेत. यात अत्यल्प गटातून 39 घरं आमदारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत.   म्हाडाच्या या जाहिरातीवर वाद निर्माण झाला आहे.

म्हाडासाठी उत्पन्नाची मर्यादा काय?

अत्यल्प उत्पन्न गट अर्थात (EWS)करिता वार्षिक 6 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा आहे. आमदारांना मात्र महिन्याला अडीच लाखांचं वेतन मिळतं. आमदारांचं वार्षिक उत्पन्न 30 लाखांपर्यंत जाते.  तरीही आमदारांसाठी राखीव घरं ठेवण्यात आली आहेत. म्हाडाच्या या जाहिरातीवर शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी जोरदार टीका केली आहे.
गोरगरीब, सामान्यांसाठी म्हाडा घरं बांधतं. मात्र, आता म्हाडानं चक्क मुंबईत आमदारांसाठी घरं ठेवली आहेत.  तेही आर्थिक दुर्बल घटकासाठी राखीव असलेल्या घरांमधून. म्हाडाला उत्पन्नाचे निषक धाब्यावर बसवून आमदारांचा इतका पुळका का आला असा प्रश्न उपस्थित झाला आहे.