मुंबई : भाजप मंगळवारी जर शपथविधी करत असेल तर त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. मात्र एका आठवड्याच्या आत त्यांना बहुमत सिद्ध करावे लागेल, तेव्हा आता दूध का दूध और पानी का पानी होवून जाऊ दे अशी प्रतिक्रीया अब्दुल सत्तार यांनी दिली आहे. जोपर्यंत अमित शहा यांच्याकडून प्रस्ताव येणार नाही, तोपर्यंत उद्धव ठाकरे काहीही बोलणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं असून जर हरियाणामध्ये स्वत: अमित शहा दुसऱ्या पक्षाशी चर्चा करतात, तशी चर्चा त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याशीही करावी. जर चर्चा केली नाही तर पर्याय आमच्याकडं आहेत असा इशाराही त्यांनी भाजपला दिला आहे.
येत्या ५ नोव्हेंबर किंवा ६ नोव्हेंबर रोजी वानखेडे स्टेडियमवर भाजप मंत्रीमंडळाचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती शासनातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. शिवसेना पुढे आली तर सोबत नाहीतर शिवसेनेशिवाय भाजपने स्वबळावर शपथविधी करण्यासाठी हालचाली सुरु केल्या आहेत. ५ नोव्हेंबर रोजी शपथविधी पार पडावा, अशी इच्छा खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. मुख्यमंत्र्यांसहीत काही ठराविक मंत्र्यांचा शपथविधी पार पडणार असल्याची माहिती, खात्रीलायक सूत्रांनी 'झी २४ तास'ला दिली आहे.