मुंबई : 'बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नारळ चार वर्षांपूर्वी फुटला होता. पण पुढं काहीच झालं नाही. त्यामुळे आपल्याला इथं यावं लागलं.' असा असल्याचा टोला युवासेना प्रमुख आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी भाजपला लगावला आहे. 'आपल्याला यामध्ये राजकारण करायचं नाही, पण या कामाला वेग यायला पाहिजे.' असंही ते म्हणाले. मुंबईसाठी गृहनिर्माण धोरण लवकर येणं गरजेचं आहे. 'संक्रमण शिबिराबाबतही निर्णय घेणं गरजेचं आहे. शिवडीमध्ये बीपीटालाबरोबर घेऊन पुनर्विकास व्हायला पाहिजे.' असंही आदित्य ठाकरे म्हणाले.
वरळी, डिलाईल रोड आणि नायगाव येथील १९४ बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे भूमिपूजन एप्रिल २०१७ मध्ये झाला होतं. ९५ वर्षे जुन्या असलेल्या या चाळींच्या पुनर्विकासाचा काम अजूनही सुरु झालेलं नाही. याआधी ही शिवसेना-भाजपमध्ये याचं श्रेय घेण्यासाठी झुंबड सुरु होती. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन झालेला हा सोहळा भाजपनं अक्षरश: हायजॅक केला होता.
बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या भूमिपूजन सोहळ्याची जय्यत तयारी वरळीच्या जांबोरी मैदानावर करण्यात आली होती. मैदानाबाहेर राजकीय पक्षांची जोरदार पोस्टरबाजी झाली होती. वरळीतल्या रस्त्यांवर सर्वत्र पोस्टर, पक्षाचे झेंडे लावण्यात आले होते. मुख्य सोहळ्याठिकाणी भाजपमय वातावरण होते. पण बीडीडी चाळींच्या अंतर्गत भागात मात्र शिवसेनेने पोस्टरबाजी करत श्रेय मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
पंधरा वर्षांच्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळात हा प्रकल्प थोडाही मार्गी लागलेला नसताना केवळ मुख्यमंत्र्यांमुळे हा प्रकल्प अडीच वर्षात सुरु होत असल्याचं भाजप नेत्यांनी म्हटलं होतं. पण आता भूमिपूजन होऊन २ वर्षाहून अधिक काळ गेला आहे. पण काम चालू झालेलं नाही. सेना भाजप सत्तेत एकत्र असली तरी श्रेयासाठी समोरासमोर दोन हात करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.