बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बेस्टच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांची माहिती

बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  

Updated: Apr 28, 2020, 03:09 PM IST
 बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, बेस्टच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांची माहिती title=
मुंबईतील वांद्रे बेस्ट डेपोत अशी नेहमी गर्दी असते.

मुंबई : बेस्टच्या एकूण १५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. बेस्टचे सात कंडक्टर आणि चार चालक हे कोरोना पॉझिटिव्ह आहेत, अशी माहिती बेस्टच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, बेस्ट कर्मचाऱ्यांना लागण होत असली तरी काही ठिकाणी नियमांचे उल्लंघन होत आहे. अनेक कर्मचाऱ्यांना ड्युटीवर बोलावले जात आहे. मात्र, त्यांना गाड्या उपलब्ध नसल्याने डेपो कार्यालयात गर्दी करताना दिसून येत आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम धाब्यावर बसविल्याचे  चित्र वांद्रे येथील डेपोमध्ये दिसत आहे.

बेस्टच्या ज्या कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्या १५ पैकी ४ जणांची कुठल्याही प्रवासाची माहिती नाही. तसेच प्रतिबंधित क्षेत्रातला संपर्क नाही. आतापर्यंत बेस्टचा २५० जणांचा स्टाफ क्वारंटाईन करण्यात आला. त्यांपैकी  १५० लोकांचा १४ दिवसांचा क्वारंटाईन कालावधी संपला आहे, मेडिकल फिटनेस बघून क्वारंटाईन कालावधी संपल्यानंतर हे कर्मचारी कामावर रुजू झाल्याची माहिती बेस्टच्या मुख्य वैद्यकिय अधिकाऱ्यांनी दिली.

 बेस्ट विद्युत विभागातील दोन जणांनाही कोरोनाची लागण झाली होती. यांपैकी एका कोरोनाबाधित कर्मचाऱ्याचा यापूर्वीच मृत्यू झाला आहे. तर दोन परिवहन अभियांत्रीकी विभागातील कर्मचारी कोरोना पॉझिटीव्ह आहेत. आतापर्यंत ७५००  जणांची वैद्यकिय तपासणी करण्यात आली आहे.

दुसरीकडे वांद्रे डेपोमध्ये चालक आणि वाहकांची गर्दी दिसून येत आहे. कोणीही नियम पाळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. अधिकारी वर्गाकडून आम्हाला कामावर बोलवले जात आहे. मात्र, आम्हाला गाड्याच उपलब्ध नसतात. मग कामावर कशाला बोलावले जाते, असा प्रश्न काही कर्मचाऱ्यांनीही उपस्थित केला आहे.