मुंबई : पोलीस दलात काम करणाऱ्या २९ वर्षीय रामेश्वर हंकारे यांनी विक्रोळी येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली. हंकारे यांच्या घरी एक चिठ्ठी सापडली आहे, ज्याच्या आधारे आता पुढील तपास सुरु असल्याची माहिती झोन ७चे पोलीस उपायुक्त अखिलेश कुमार सिंह यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार हंकारे हे मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कक्षात कार्यरत होते. सोमवारी सायंकाळी हंकारे यांचे सहकारी घरी परतले असता घराचं दार आतून बंद असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. वारंवार दार वाजवूनही ते उघडलं न गेल्यामुळे त्यांनी खिडकीतून वाकून पाहिलं तेव्हा हंकारे यांनी गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला.
हंकारे यांच्या मित्रानं त्यानंतर तातडीने नियंत्रण कक्षाला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. पण, तेथून कोणतंही उत्तर मिळालं नाही. ज्यानंतर अखेर त्यांनी पोलिसांना याविषयीची माहिती देण्यासाठी विक्रोळी पोलीस स्थानकात धाव घेतली. तत्पूर्वी हंकारे यांच्या मित्राने त्यांचा मृतदेह खाली उतरवला होता. सध्याच्या घडीला या प्रकरणी अपघाती मृत्यू प्रकरणीची तक्रार म्हणजेच एडीआर (ऍक्सिडेंटल डेथ रिपोर्ट) दाखल करण्यात आला आहे. ज्याप्रकरणीचा पुढील तपासही सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.