दादरहून सुटणाऱ्या निम्म्या लोकल परळ स्थानकातून सूटणार

परळ स्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठा दिलासा

Updated: Jan 29, 2019, 04:20 PM IST
दादरहून सुटणाऱ्या निम्म्या लोकल परळ स्थानकातून सूटणार title=

मुंबई : मुंबई आणि परिसरातल्या लाखो लोकलप्रवाशांसाठी आणखी एक दिलासादायक बातमी आहे. परळ टर्मिनसचं काम पूर्ण झाल्यानंतर दादरहून सुटणाऱ्या निम्म्या लोकल परळ स्थानकातून सोडण्यात येणार आहेत. तर कर्जत-पनवेल लोकलसेवा लवकरच सुरू करण्यात येणार आहे. परळहून सुटणाऱ्या लोकलचा फायदा परळ भागातली खासगी कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना होणार आहे. त्यांचा परळहून दादरला जाण्याचा द्रविडी प्राणायाम बंद होणार आहे. दुसरीकडं गेल्या अनेक वर्षांपासून पनवेल- कर्जत लोकलसेवेची मागणी पूर्णत्वाला जाते आहे. पनवेल ते कर्जत हे लोकलसेवेनं जोडण्यात येणार आहे. या लोकलमुळे कल्याण पट्ट्यातील प्रवाशांचा ठाणेमार्गे प्रवास बंद होणार आहे. 

लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधीच या परळ टर्मिनसचे उद्घाटन करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे लवकरच परळ-कल्याण लोकल सुरु होणार आहे. दादर स्थानकातील भार देखील यामुळे कमी होणार आहे. दादरमधून ३२ लोकल फेऱ्या कमी करुन त्या परेल स्थानकातून सोडण्याचा विचार सध्या सुरु आहे. 

दादर स्थानकात मोठ्या प्रमाणात गर्दी होते. परळ स्थानकातून प्रवास करणाऱ्यांची संख्या देखील मोठी आहे. त्यामुळे यातून रेल्वे प्रवाशांची सुटका व्हावी म्हणून दादरहून सुटणाऱ्या सुमारे ५० टक्के लोकल फेऱ्या परळ स्थानकातून सुटणार आहेत. परळ टर्मिनसच्या नव्या फलाटाचं काम १० फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्यात येईल. 

कल्याण, बदलापूर-अंबरनाथ-कर्जत आणि टिटवाळा-आसनगाव-कसारा मार्गावरील लोकल फेऱ्या परळ टर्मिनसवरून सुटणार आहेत. तर कुर्ला-ठाणे-घाटकोपर या लोकल दादर स्थानकातून सूटणार आहेत. परळ टर्मिनसवरून आणखी नवीन लोकल फेऱ्या देखील सुरू करण्याचा विचार रेल्वे प्रशासन करत आहे.