मुंबई : धारावीत कोरोनाचा चौथा रूग्ण सापडल्याने मरकजचे कनेक्शन आणखी घट्ट होताना दिसतं आहे. धारावीच्या डॉ बालिगा नगरमध्येच आणखी एक रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. कोरोनाने मृत्यू पावलेल्या ५९ वर्षीय व्यक्तीच्या इमारतीजवळील इमारतीत ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्याचं कळतं आहे.
दिल्ली मरकजच्या कार्यक्रमात सहभाग घेवून ५ जण धारावीत आले होते, ते इथं २-३ दिवस राहिले होते. त्यावेळी या कोरोनानं मृत पावलेल्या व्यक्तीने त्याच्या दुस-या फ्लॅटमध्ये त्यांच्या राहण्या-खाण्याची व्यवस्था केली होती. या २-३ दिवसांच्या कालावधीत मरकजहून आलेल्या व्यक्तींच्या संपर्कात किमान १०० जण आल्याची माहिती मिळते आहे.
तबलिगी जमातचे हे ५ जण नंतर केरळला गेले. परंतु त्यांच्या संपर्कात आलेल्या डॉ बालिगा नगरच्या ५९ वर्षीय व्यक्तीचा कोरोनानं दोन दिवसांपूर्वी मृत्यू झाला आहे. आता याच बालिगानगरधील ३० वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाल्यानं मरकज कनेक्शन घट्ट होत असून मुंबईसाठी ही धोक्याची घंटा आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या रुग्णांची संख्या ५०० च्या वर पोहोचली आहे. आज कोरोनाचे आणखी २७ रुग्ण आढळून आले आहेत. मुंबई हे कोरोनासाठी हॉटस्पॉट बनलं आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण हे मुंबईत आढळून आले आहेत. आता आणखी रुग्ण वाढण्याची भीती वर्तवण्यात येत आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा एकदा नागरिकांना घरातच राहण्याचं आवाहन केलं आहे.