मुंबई : कोरोना विषाणू बाधित भागातून आलेल्या राज्यातील ४१ प्रवाशांपैकी ४० जणांच्या तपसणीनंतर त्यांचे अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती मिळत आहे. रुग्णालयात निरिक्षणाखाली दाखल असलेल्या ४१ पैकी ३९ जणांना घरी सोडण्यात आलं आहे. सध्या मुंबई, पुण्यात एक-एक जण दाखल आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत २७ हजार ८९४ प्रवाशांची तपसणी करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.
राज्यात कोरोना विषाणू बाधित भागातून १७३ प्रवासी आल्याची माहिती आहे. ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणं आढळल्याने, आतापर्यंत राज्यातील ४१ जणांना भरती करण्यात आलं होतं. त्यापैकी मंगळवारी सायंकाळी एका प्रवाशाला सर्दी, खोकला अशी सौम्य लक्षणं आढळल्यानंतर त्याला पुण्यातील नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तर एकाला मुंबईत कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
रुग्णालयात भरती करण्यात आलेल्यांपैकी ४० जणांचे नमुने निगेटिव्ह असल्याचं एन.आय.व्ही पुणे यांनी सांगितलं आहे. तर रुग्णालयातील एकाचा अहवाल बुधवारपर्यंत मिळणार आहे. केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, चीनमधून येणाऱ्या सर्व प्रवाशांना रुग्णालयात दाखल करुन त्यांना तपासण्याचं धोरण राज्यात राबविण्यात येत आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगात हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस या व्हायरसमुळे मृतांच्या आकड्यात वाढ होताना दिसत आहे. संपूर्ण देशभरात १७ हजार लोकांना या व्हायरसची लागण झाली असल्याची माहिती आहे. यामुळे भारत सरकारने खबरदारी म्हणून चीनी पासपोर्ट धारकांचा ई-व्हिसा रद्द केला. परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनाच्या माध्यमातून हा निर्णय घेण्यात आला आहे.
भारतात कोरोनाचे दोन रुग्ण अढळले आहेत. केरळमधील दुसऱ्या रुग्णाला चाचण्यांअंती कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी चीनला जाऊन आलेली. त्यानंतर आता या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे.