अंधेरीत तरुणीचं 2 महिने शोषण..'इस्लाम' स्वीकारण्यास जबरदस्ती

 त्याने तरूणीचे केस कापले आणि इस्लाम धर्म स्वीकारण्याची तो सतत जबरदस्ती करत होता.

Updated: Sep 7, 2018, 09:11 AM IST
अंधेरीत तरुणीचं 2 महिने शोषण..'इस्लाम' स्वीकारण्यास जबरदस्ती title=

मुंबई : २७ वर्षीय तरूणीला दोन महिने घरात कोंडून ठेऊन तरूणीवर बलात्कार झाल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरीत उघड झालायं. याप्रकरणी ओशीवरा पोलिसांनी बलात्कार आणि इतर कलमांअंतर्गत सय्यद अमीर सययद मन्सूर उर्फ शेरोज खान या इसमाला अटक केलीयं. या दोन महिन्यांच्या काळात शेरोजने या तरूणीचं लैंगिक शोषण केलं. त्याचे व्हीडीओ करून ते व्हायरल करण्याची धमकी दिली. त्याने तरूणीचे केस कापले आणि इस्लाम धर्म स्वीकारण्याची तो सतत जबरदस्ती करत होता.

2 महिने अत्याचार 

पीडित मुलगी मूळची पुण्याची असून ती काही महिन्यांपूर्वी मुंबईत आली होती. त्यानंतर तिची ओळख शेरोजशी झाली. जून महिन्यात रमजान महिन्यात ईद निमित्त शेरोजने तरूणीला आपल्या घरी बोलावलं. घरी त्याने तिला शिरकूर्मा खायला दिला. मात्र जेवण झाल्यावर तरूणी बेशुद्ध झाली. त्यानंतर या नराधमाने तरूणीवर लैंगिक अत्याचार केले. या सगळ्याचं चित्रीकरणही केलं. त्याचीच भीती दाखवून तब्बल २ महिने तो मुलीवर अत्याचार करत होता.

दहशतवादी मित्र

शेरोजने तो झाकीर नाईकचा समर्थक असून दाऊद इब्राहीमपासून अबू सालेमपर्यंत सगळे गँगस्टर त्याचे मित्र असल्याचं सांगत तरूणीला घाबरवलं होतं.