7 लाख बँक कर्मचाऱ्यांना मिळाली घसघशीत पगारवाढ! आता काम कमी होणार, पगार वाढणार

Annual Salary Hike For Bank Employees: बँक कर्मचाऱ्यांना एकाच वेळी 2 गोड बातम्या मिळाल्या आहेत. या निर्णयाचा फायदा 7.5 लाखांहून अधिक बँक कर्मचाऱ्यांना होणार असल्याचं सांगितलं जात आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठीही एक गुड न्यूज आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Mar 9, 2024, 08:59 AM IST
7 लाख बँक कर्मचाऱ्यांना मिळाली घसघशीत पगारवाढ! आता काम कमी होणार, पगार वाढणार title=
7.5 लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

Annual Salary Hike For Bank Employees: लोकसभेच्या निवडणुकीआधी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जात असतानाच आता बँक कर्मचाऱ्यांसंदर्भातील महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पगारवाढीबरोबरच बँक कर्मचाऱ्यांना आता सरसकट 5 दिवसांच्या आठवड्याचा लाभ मिळू शकणार आहे. यापैकी पगारवाढीवर शिक्कामोर्तब झालं असून 5 दिवसांच्या आठवड्यासंदर्भातील निर्णयाबद्दल बँकांनी एक पाऊल पुढे टाकल्याने हा निर्णय अधिक दृष्टीक्षेपात आला आहे.

17 टक्के पगारवाढ

बँक कर्मचाऱ्यांना 17 टक्के पगारवाढ देण्याच निश्चित करण्यात आलं आहे. यासंदर्भातील द्विपरक्षीय करारावर शुक्रवारी बँक युनियनची संस्था असलेल्या युनायटेड फोर ऑफ बँक युनियन्स आणि इंडियन बँक असोसिएशन या दोन्ही संघटनांच्या प्रतिनिधींनी सह्या केल्या. महाराष्ट्र स्टेट बँक कर्मचारी फेडरेशनचे सरचिटणीस देवीस तुळजापूरकर यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या वेतनवाढीचा फायदा 7 लाख बँक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना होणार आहे. या निर्णयामुळे 10 खासगी, 12 सरकारी आणि 3 परदेशी बँकांमधील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ मिळण्याचा मार्ग खुला झाला आहे. विशेष म्हणजे 7.5 लाख सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाही या करारामुळे मासिक तत्वावर आर्थिक लाभ मिळणार आहे.

12 हजार 449 कोटींचा अतिरिक्त भार

शुक्रवारी बँक कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीसंदर्भात झालेल्या या निर्णयामुळे बँकांच्या व्यवस्थापकांना दरवर्षी सुमारे 12 हजार 449 कोटींचा अतिरिक्त आर्थिक भाग सहन करावा लागणार आहे. पगारवाढीचा हा करार ऑक्टोबर 2027 पर्यंत लागू असणार आहे. सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देण्यासाठी बँकांना 2 हजार कोटींचा अतिरिक्त भार सहन करावा लागेल. सदर पगारवाढ ही 2022 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावानुसार लागू होणार आहे. या वेतनवाढीमुळे मूळ वेतन, रजा, लिव्ह इन कॅश, महागाई भत्ता, विशेष वेतन, विशेष भत्ता, घरभाडे भत्ता यासारख्या तरतूदींअंतर्गत मिळणाऱ्या रक्कमेमध्ये भरघोस वाढ होणार आहे. महिला कर्मचाऱ्यांच्या सेवाशर्तींमध्ये विशेश सुधारणा करण्यात आली आहे. 

5 दिवसांचा आठवडा लवकरच?

मागील बऱ्याच काळापासून बँक कर्मचाऱ्यांकडून सरसकटपणे पाच दिवसांचा आठवडा असावा अशी मागणी केली जात आहे. या मागणीला सदर करारामध्ये तत्वत: मान्यता दिली आहे. ही मागणी प्रत्यक्षात अंमलात आणण्यासाठी आवश्यक ती प्रक्रिया पूर्ण करण्यासंदर्भात सहमती दर्शवली आहे. सध्याच्या नियमांनुसार दर महिन्याचा दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँक कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली जाते. मात्र आता ही सुट्टी सरसकट करावी आणि सर्व शनिवार, रविवारी सुट्टी दिली जावी या मागणीसंदर्भातील हलचालींना वेग देण्यात येणार असून लवकरात लवकर त्याची मंजूर घेतली जाईल यासाठी प्रयत्न केला जाणार आहे. फाइव्ह डेज वीक सुरु झाल्यास बँक कर्मचाऱ्यांना एक दिवस कमी काम करावं लागेल.

नक्की वाचा >> 'त्या' प्राध्यापकांबद्दल शिंदे सरकार मोठा निर्णय घेणार! केली 1200 कोटी रुपयांची तरतूद

बँकांतून पुरेश्या प्रमाणात नोकरभरती केली जावी. आऊटसोर्सिंग बंद करावे या मुद्द्यांवर चर्चा करण्यास बँकांनी होकार दिला आहे. सध्या बँकांमधील आवश्यक कर्मचारी संख्येपक्षा कमी कर्मचारी नियुक्त असल्याने कामाचा ताण अधिक असल्याचा बँक कर्मचाऱ्यांचा दावा आहे. त्यामुळेच नोकरभरतीचा मागणी केली जात आहे.