मोठी बातमी: धारावीत आणखी १५ जणांना कोरोनाची लागण

धारावीतील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४३ इतका झाला आहे. 

Updated: Apr 12, 2020, 10:27 AM IST
मोठी बातमी: धारावीत आणखी १५ जणांना कोरोनाची लागण title=

मुंबई: शहरातील कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) प्रादुर्भावाचा हॉटस्पॉट असलेल्या धारावी परिसरात रविवारी कोरोनाचे १५ नवे रुग्ण सापडले. यापैकी सहाजण हे हायरिस्क कॉन्टॅक्टमधील आहेत. या सर्वांना राजीव गांधी स्पोर्टस कॉम्पेक्समध्ये क्वारंटाईन करण्यात आले होते. तर उर्वरित नऊ रुग्ण धारावीच्या शास्त्रीनगर परिसरातील आहेत. त्यामुळे आता धारावीतील कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा ४३ इतका झाला आहे. याशिवाय, दादर परिसरातही कोरोनाचे दोन नवे रुग्ण आढळून आले आहेत. कालच येथील चितळे पथ परिसरातील एक कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे समोर आले होते. दादरमधील कोरोनाग्रस्तांची एकूण संख्या आता १३ वर गेली आहे. 

मात्र, तरीही धारावीतील नागरिकांना अजूनही कोरोनाचे फारसे गांभीर्य नसल्याचे वारंवार दिसून येत आहे. येथील नागरिक भाजी खरेदीसाठी अजूनही गर्दी करताना दिसत आहेत. यावेळी सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांना अक्षरश: हरताळ फासला जात आहे. कोरोनाचे रुग्ण आढळल्यानंतर धारावीतील अनेक परिसर सील करण्यात आले आहेत. पोलिसांनी बॅरिकेटस् लावून येथील रस्त्यांची नाकेबंदी केली आहे. 

धारावी हा मुंबईतील कोरोनाचा हॉटस्पॉट मानला जात आहे. त्यामुळे आता याठिकाणी लवकरच कोरोनाच्या रॅपिड टेस्टला सुरुवात होणार आहे. त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने दक्षिण कोरियाकडून जवळपास एक लाख टेस्ट किटस् मागवली आहेत. याशिवाय, केंद्र सरकारकडूनही काही किटस् मिळणार आहेत. राज्यभरात आतापर्यंत १,८३८ रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी १,१४६ रुग्ण एकट्या मुंबईत आहेत.