नवी मुंबई: राज्यात आज दिवसभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी भर पडली आहे. या रुग्णांमध्ये नवी मुंबईतील अवघ्या दीड वर्षांच्या बाळाचा समावेश आहे. या बाळाच्या इतर तीन कुटुंबीयांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजते. या चौघांवर सध्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.यापूर्वी कल्याणमधील तीन वर्षांच्या मुलीला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सध्या या मुलीची प्रकृती स्थिर असल्याचे समजते.
Coronavirus: मुंबईतील हिंदुजा रुग्णालयाचा परिसर निर्मनुष्य करणार
दरम्यान, नवी मुंबईत आज दिवसभरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली. आज नवी मुंबईत परदेशातून आलेल्या ९५ नागरिकांशी संपर्क साधण्यात आला. या सर्वांना प्रशासनाकडून होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. तर काहीवेळापूर्वीच वसई-विरारमध्येही कोरोनाचा आणखी एक रुग्ण आढळून आला. पहिला रुग्ण ज्या परिसरात राहत होता त्याचठिकाणी हा रुग्णदेखील वास्तव्याला आहे. हा रुग्ण चार दिवसांपूर्वी दुबईवरून परतला होता. कोरोनाची लक्षण जाणवू लागल्यानंतर हा रुग्ण खासगी रुग्णवाहिकेने कस्तुरबा रुग्णालयात गेला. याठिकाणी चाचणी केली असता त्याला कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
पुढील १५ दिवस कसोटीचे, आता घराबाहेर पडूच नका- उद्धव ठाकरे
दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही शुक्रवारी रात्री फेसबुकच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आगामी १५ ते २० दिवस आपल्यासाठी अत्यंत कसोटीचे असल्याचे सांगितले. या काळात रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू शकते. त्यामुळे आता नागरिकांनी कृपा करून घराबाहेर पडूच नये, असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले.