हा चहा होतोय खुपच बदनाम

लाखोंची नोकरी सोडून इंजिनीअर मित्रांचा असाही स्टार्ट अप  

Updated: Dec 30, 2021, 08:38 PM IST
हा चहा होतोय खुपच बदनाम title=

औरंगाबाद : ज्याला चहाची तलफ येत नाही असा माणूस विरळाच. चहा म्हणजे गरिबांचे पेय आणि गरिबांनी करण्याचा व्यवसाय असा समज वर्षानुवर्षे चालत आला आहे. मात्र, या समजाला छेद देत चहाच्या व्यवसायात अनेकांनी उडी घेतली. या व्यवसायात आपला जम बसविला.

निरनिराळ्या चवीचा, अनेक फ्लेवरचा चहा सामान्यांसोबतच श्रीमंतांनाही खुणवू लागला. जस जशी या चहाची महती वाढू लागली. तस तसे याचे अनेक ब्रँड तयार होऊ लागले. सध्या औरंगाबादमध्ये अशाच एका ब्रॅण्डची चर्चा सर्वत्र सुरु आहे. हा ब्रँड बदनाम आहे.

होय, या ब्रँडचे नाव आहे, बदनाम... आणि या ब्रँडचा निर्माता आहे एम टेक झालेला एक अभियंता... चहा बनवून त्याचा आस्वाद घेणारा तुषार शिंदे. त्याने बेंगलोर येथून एम टेक पदवी घेतली. त्यांनतर एका परदेशी कंपनीत चांगली नोकरी ही मिळवली. मात्र, तेथे त्याचे काही मन लागत नव्हतं.

पगार मोठा होता मात्र, आनंद मिळत नव्हता. त्यामुळे तुषारने ठरवले की चहाचं दुकान उघडायचं. नोकरी सोडली आणि त्यानं औरंगाबाद गाठलं. कुटुंबियांना त्याने ठामपाने सांगितलं की, नोकरी करणार नाही. चहाचे दुकान उघडणार, व्यवसाय करणार. 

त्याला घरच्यांनी वेड्यात काढलं. ते त्याला म्हणाले, तू घराचं नाव बदनाम करणार.. तुषारसारखाच आणखी एक दुसरा ध्येयवेडा मित्र त्याला भेटला. तो हि अभियंता.. या दोघानी जिद्दीनं चहाचाच धंदा सुरु केला.. आणि त्याचं नाव ठेवलं बदनाम चहा.     

हळूहळू स्टार्ट अप सुरु झालं. महिन्याकाठी 24 हजार कप चहा विकला जाऊ लागला. महत्वाचं म्हणजे चहा देताना तो मातीच्या कपात म्हणजे कुल्हड मध्ये दिला जातो. त्यांनतर ते कुल्हाड फेकून देतात.. नफा थोडा कमी होतो पण चहाला मातीच भांड, त्यातून स्वच्छता आणि कुंभारालाही काम मिळतं. हे सगळं साध्य होतंय. ग्राहक ही खुश आहेत.

येथे येणाऱ्या ग्राहकांना चहासोबत आवडत गाणं ऐकण्याची सोय आहे. गरजूंना कपडे मिळण्याची सोयही इथे केली आहे. या अभियंता मित्रांनी एकत्र येऊन वेगळी वाट निवडली. यशस्वी होण्यासाठी हिम्मत लागते आणि हेच या तरुणांनी करून दाखवलं आहे.