बीड: गेल्या अनेक दिवसांपासून सुरु असलेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा अखेर शनिवारी थंडावल्या. यावेळी परळी येथे झालेल्या समारोपाच्या सभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना चक्कर आली. ही सभा आटोपल्यानंतर पंकजा मुंडे व्यासपीठावरच उभ्या होत्या. तेव्हा पंकजा मुंडे यांना दरदरून घाम यायला लागला आणि त्या खाली बसल्या. यावेळी स्टेजवर उपस्थित असलेले कार्यकर्ते त्यांच्या मदतीला धावले. कार्यकर्त्यांनी पंकजा यांच्या तोंडावर पाणी मारून आणि हवा घालून त्यांना शुद्धीवर आणले.
यानंतर पंकजा मुंडे त्यांच्या घरी नेण्यात आले. याठिकाणी त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असली तरी डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.
पवारांच्या सभेतील 'साळुंखे मंडप डेकोरेटर्स' सोशल मीडियावर व्हायरल
पंकजा मुंडे या प्रचारासाठी राज्याच्या विविध भागांमध्ये फिरत आहेत. विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु झाल्यापासून त्या सातत्याने सभा घेत फिरत आहेत. त्यामुळे पंकजा मुंडे यांना पुरेशी विश्रांती मिळालेली नाही. आजदेखील सकाळपासून त्या प्रचारात व्यग्र होत्या. तापमान वाढल्यामुळे त्यांच्या शरीरातील पाणी कमी झाले असावे (डिहायड्रेशन) आणि त्यांना चक्कर आल्याचा डॉक्टरांचा अंदाज आहे.
'एक दिवस मोदी रोहित पवारांच्या मतदारसंघातील विकासकामं पाहायला येतील'
दरम्यान, पंकजा मुंडे यांना उद्याचा दिवस विश्रांतीसाठी मिळणार आहे. यानंतर परवा विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होत आहे. २४ ऑक्टोबरला याचा निकाल जाहीर होईल. यंदा परळी मतदारसंघात पंकजा मुंडे यांच्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेसच्या धनंजय मुंडे यांचे आव्हान आहे. ही लढत अटीतटीची होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.