अरूण मेहेत्रे, झी मीडिया, पुणे : गुणवत्ता नसल्याच्या कारणावरुन ज्या शाळा बंद करायच्या निर्णय घेतला, त्याच शाळा अ दर्जाचा असल्याचा साक्षात्कार शिक्षण विभागाला झाला आहे.
गुणवत्ता नसल्याच्या कारणावरून बंद करावयाच्या शाळांची यादी जिल्हा परिषदांनी तयार केली आहे. मात्र त्यानंतर अवघ्या काही दिवसांतच त्यातल्याच काही शाळा चक्क अ दर्जाच्या असल्याचा साक्षात्कार शिक्षण विभागाला झाला आहे.
विशेष म्हणजे अशा गुणवत्ता पूर्ण शाळांच्या अभिनंदनाची पानभर जाहिरातही शिक्षण विभागानं प्रसिद्ध केलीय. पुणे जिल्ह्यातल्या ८ आणि नगर जिल्ह्यातील १० शाळांना अशी दुहेरी पात्रता लाभलीय. शिक्षण तज्ज्ञ किशोर दरक यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.
नवी दिल्लीतल्या न्यूपा या संस्थेनं राज्यातील अ श्रेणी प्राप्त शाळांची यादी तयार केलीय. त्या सर्व शाळांचं नावांनीशी अभिनंदन करणारी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
या जाहिरातीतील पहिल्याच क्रमांकावर पुणे जिल्ह्यातील बेंदवस्तीची शाळा आहे. म्हणजे शासन जी शाळा बंद करायला निघालय तीच शाळा अचानकपणे अभिनंदनास पात्र ठरली आहे.