Teachers Job: निवृत्त शिक्षकांना ZP शाळांमध्ये नोकरीची संधी; वयोमर्यादा, पगाराबद्दल जाणून घ्या

Zilla Parishad School: प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागविण्यात येणार आहेत.

Pravin Dabholkar | Updated: Jul 7, 2023, 09:20 PM IST
Teachers Job: निवृत्त शिक्षकांना ZP शाळांमध्ये नोकरीची संधी; वयोमर्यादा, पगाराबद्दल जाणून घ्या title=

Zilla Parishad School: राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये रिक्त पदांवर निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. जिल्हा परिषद शाळांमधील शिक्षकांच्या नियुक्तीची प्रक्रिया रखडल्यामुळे मोठ्या प्रमाणावर शिक्षकांच्या जागा रिक्त आहेत. परिणामी विद्यार्थ्यांना शिकवण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. 

या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी शाळांमध्ये तात्पुरत्या स्वरूपात निवृत्त शिक्षकांची नियुक्ती करण्याचे आदेश शिक्षण आयुक्तांनी दिले आहेत. रिक्त जागांवर नियुक्ती करण्यात आलेल्या निवृत्त शिक्षकांना प्रति महिना वीस हजार रुपये मानधन देण्यात येणार आहे.

शाळांमध्ये नियमित शिक्षक उपलब्ध झाल्यानंतर निवृत्त शिक्षकांचे बंधपत्र ( बाँड) संपुष्टात येईल. शाळांमध्ये नियुक्त करावयाच्या निवृत्त शिक्षकाचे वय 70 पेक्षा जास्त नसावे अशी अट घालण्यात आली आहे.

नियुक्तीच्या कालावधीत करार पध्दतीने शिक्षकीय पदाचे दिलेले काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहणार आहे. 

बंधपत्र / हमीपत्रामध्ये करार पध्दतीने नियुक्ती देताना शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या अटी आणि शर्थींचे पालन करणे आवश्यक आहे. 

करार पध्दतीने नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. 

प्रत्येक जिल्ह्यांसाठी संबंधित शिक्षणाधिकारी (प्राथमिक) व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी पात्र आणि इच्छुक उमेदवारांमधून अर्ज मागविण्यात येणार आहेत.

त्यानंतर संबंधित शाळेतील रिक्त शिक्षकीय पदाची गरज लक्षात घेऊन त्याप्रमाणे अत्यावश्यक पदावर नियुक्ती देण्यात येणार आहे. ही नियुक्ती नियमित शिक्षक उपलब्ध होईपर्यंतच असणार आहे, याची नोंद घ्यावी. पुढील 15 दिवसांत याबाबतची कार्यवाही केली जाणार आहे.