झी २४ तास इम्पॅक्ट: 'हाफकिन अजिंठा' कंपनी पुन्हा सुरु होणार

...

Updated: Jun 17, 2018, 10:49 AM IST
झी २४ तास इम्पॅक्ट: 'हाफकिन अजिंठा' कंपनी पुन्हा सुरु होणार title=

विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव : बातमी झी मीडियाच्या दणक्याची... गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून बंद पडलेलं जळगाव एमआयडीसीतील हाफकिन कंपनीचं युनिट येत्या आठवडाभरात सुरु होणार आहे. झी २४तासच्या पाठपुराव्यामुळं राज्याचे अन्न औषध आणि नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी हाफकिन इन्स्टिट्यूटला भेट दिली. आता युनिट सुरु करण्याबाबत हालचालींना वेग आलाय.

जेनेरिक औषधांची निर्मिती करणाऱ्या जळगावमधील हाफकिन अजिंठा फार्मास्युटिकल्सच्या युनिटमधून गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून एकही लस बाहेर पडलेली नाही. त्यामुळे इथले कर्मचारी देखील हातावर हात धरून बसले होते. झी २४ तासने हाफकीनची दुरवस्था जगासमोर मांडली. त्यानंतर अन्न, औषध तसंच नागरी पुरवठामंत्री गिरीश बापट यांनी जळगावातील हाफकिन कंपनी बंद पडणार नाही अशी ग्वाही दिली होती. त्यानुसार मंत्री गिरीश बापट यांनी हाफकीनला भेट देऊन कंपनी सुरु करण्याबाबत आढावा घेतला. आता जळगावच्या हाफकिनमधून ४१ औषधी निर्माण होतील. अशी ग्वाही गिरीश बापट यांनी दिलीये.

संचालक तसंच अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे ऑर्डर असूनही कच्च्या मालाचा पुरवठा कमी असल्याचं दाखवून इथली औषधं निर्मितीच ठप्प पडली होती. राज्याच्या चारशे कोटींच्या औषधी खरेदीचे अधिकार असताना साधी चार पाच कोटींची ऑर्डर महामंडळाचे अधिकारी जळगावचं युनिटला देऊ शकत नव्हतं. याबाबत अजिंठा कामगार युनिटने वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार केला होता. झी २४ तासनेदेखील यासंदर्भात पाठपुरावा केला. अखेर या पाठपुराव्याला यश आलं. कंपनी पुन्हा सुरु होणार असल्यानं कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

वर्षाकाठी २० ते २५ कोटी रुपयांची जेनरिक औषधे बनविण्याची क्षमता हाफकिन कंपनीच्या जळगाव युनिटमध्ये आहे. आता ही औषध निर्मिती झाल्यानं गरिबांना त्यांची हक्काची औषधं सरकारी दवाखान्यात सवलतीच्या दरात उपलब्ध होतील अशी अपेक्षा आहे.