इराकच्या तरुणांकडे 'नागपूर विद्यापीठा'ची पदवी; एका झटक्यात गेली 27 जणांची नोकरी

नागपुरातील बोगस डिग्री प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची चिन्हं आहेत. देशातील काही विद्यापीठांच्या नावेही बोगस डिग्री दिल्याची  माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. 

Updated: Jun 26, 2023, 04:23 PM IST
इराकच्या तरुणांकडे 'नागपूर विद्यापीठा'ची पदवी;  एका झटक्यात गेली 27 जणांची नोकरी    title=

Nagpur Crime News : इराक मधील  27 तरुणांनी नागपूर विद्यापीठाच्या पदवीवर नोकरी मिळवली. मात्र, एका झटक्यात हे सर्व तरुण बेरोजगार  झाले आहेत. इराक दूतावासाकडून या पदव्यांची पडताळणी करण्यात आली. यावेळी या सर्वांच्या पदव्या बोगस असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. इराक मधील या तरुणांनी नागपुर विद्यापिठाच्या या बोगस पदव्या कशा मिळवल्या याचा तपास सध्या सुरु आहे. आतंरराष्ट्रीय स्तरावरील बोगस डिग्रीचे प्रकरण उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. बोगस पदव्या उपलब्ध करुन देणारे मोठे रॅकेट कार्यरत असू शकते अशी देखील शंका उपस्थित केली जात आहे.  

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या नावावर या बोगस पदव्या तयार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या  प्रकरणात भाजपकडून पोलिसात तक्रार दाखल करणार येणार आहे. याप्रकरणी नागपूर विद्यापीठाने अजूनपर्यंत पोलिसात केवळ माहिती दिली आहे. या बोगस पदव्यांच्या आधारावर या 27 विद्यार्थ्यांनी इराक मध्ये नोकरी मिळविली होती. 

असा उघडकीस आला बोगस डिग्रीचा प्रकार

नागपुरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या नावावर इराक मधील 27 तरुणांनी त्यांच्याच देशात नोकरी मिळवली. इराक दूतावासाकडून या पदव्यांच्या पडताळणीसाठी विद्यापीठ आणि संबंधित महाविद्यालयात संपर्क केल्यावर हा प्रकार उघडकीस आला. नागपूर विद्यापीठाचा लोगो आणि कुलगुरूंची खोटी सह्या वापरून या बोगस पदव्या तयार केल्या होत्या. यासंदर्भात विद्यापीठाने केंद्र सरकारचा शिक्षण विभाग, परराष्ट्र मंत्रायल, गृहविभाग आणि विद्यापीठ अनुदान आयोगाकडे माहिती दिली आहे. 

या बोगस पदव्यांच्या माध्यमातून नोकरी मिळविणारे तरुण हे इराक मधील आहेत. मात्र, त्यांनी नागपूर विद्यापीठाच्याच बोगस पदव्या का आणि कशा तयार केल्या हा प्रश्न आहे. त्यामुळे यामागे विद्यापीठातील किंवा कुण्या एजंट, एजन्सी चा हात आहे का, या अनुषंगाने सुद्धा तपास करण्याची गरज आहे. 

60 हजारांत बोगस डिग्री

शिक्षणाचं माहेर घर म्हणून ओळख असलेल्या पुण्यात टीईटीनंतर आणखी एक घोटाळा उघडकीस आला होता.  दहावी, बारावी, बीए, बी कॉमची बोगस डिग्री देणा-या टोळीचा पर्दाफाश झाला होता.बनावट डिग्री बनवणा-या छत्रपती संभाजीनगरच्या टोळीने विद्यापीठांची बनावट वेबसाईट बनवली आणि बोगस डिग्री विकल्या आहेत. आतापर्यंत 2700 जणांना दहावी, बारावी, बीए, बीकॉम, आयटीआयची बोगस डिग्री 60 हजारांत विकल्याची धक्कादायक माहिती समोर आली.अनेकांनी तर या बोगस डिग्रीवर नोक-या मिळवल्याचं उघड झालंय...या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी इब्राहिम सय्यद, कृष्णा गिरी, अल्ताफ शेख यांना अटक करण्यात आली.