रत्नागिरी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि गुहागरचे विद्यामान आमदार भास्कर जाधव देखील लवकरच शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे संकेत दिले आहेत. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्याची अधिकृत कबुली भास्कर जाधव यांनी आज दिली. त्यांनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर कबुली दिली आहे.
भास्कर जाधव हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची चर्चा गेल्या चार दिवसांपासून सुरू होती. याबाबत स्वतः जाधव यांनीच आता स्पष्टीकरण दिले आहे. उद्धव ठाकरे यांनी आपणास शिवसेना प्रवेशाचं आमंत्रण दिले आहे. याबाबत कुटुंबीयांशी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेऊ, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मूळचे शिवसेनेचे भास्कर जाधव स्वगृही परतण्याचे संकेत दिले आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात राष्ट्रवादीला हादरा बसणार आहे. त्याआधी राष्ट्रवादीचे माजी मंत्री आणि आधीचे आमदार उदय सामंत यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आता ते शिवसेनेचे आमदार असून ते म्हाडाचे अध्यक्षही आहेत.
२००४ साली शिवसेनेकडून झालेल्या अन्यायाचा निषेध करत भास्कर जाधव यांनी शिवसेनेला अखेरचा जय महाराष्ट्र केला होता. आता तब्बल १५ वर्षांनी ते पुन्हा एकदा शिवसेनेच्या वाटेवर आहेत. उद्धव ठाकरे यांच्या भेटीत सगळे मळभ दूर झाल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
उद्धव ठाकरे आणि आपली १५ वर्षानंतर प्रथमच भेट झाली. त्याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंत्री केल्यावर स्व. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी फोन करून अभिनंदन केले होते. त्यावेळी त्यांनी मोठा हो, असा आशीर्वाद दिला होता. मात्र, त्यांच्यानंतर प्राथमच उद्धव ठाकरे यांची भेट झाली, असे जाधव यांनी यावेळी सांगितले.