कैलास पुरी/किरण ताजणे झी मीडिया, पिंपरी-चिंचवड/नाशिक : येस बँकेवरील निर्बंधांचा फटका पिंपरी चिंचवड महानगर पालिकेला बसलाय. बँकेमध्ये महापालिकेचे तब्बल 983 कोटी रुपये अडकलेत. नाशिक महापालिकेचीही हीच अडचण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड मध्ये येस बँकेमधल्या पैशांवरून राजकारण चांगलेच तापलं आहे. महापालिकेमध्ये भाजप सत्तेत आल्यानंतर महापालिकेच्या दैनंदिन संकलनाचे पैसे येस बँकेत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ऑगस्ट २०१८ मध्ये महापालिकेचे तब्बल एक हजार कोटी रुपये या बँकेत होते.
बँकेत असलेल्या रकमेतले काही पैसे पालिकेने काढून घेतले. त्यानंतरही व्याज धरून महापालिकेचे तब्बल ९८३ कोटी रुपये या बँकेत आहेत. या बँकेत पैसे ठेवण्याचा निर्णय का घेतला याची चौकशी व्हावी अशी मागणी आता होत आहे. सत्ताधारी भाजपने मात्र विरोधकांचे आरोप फेटाळले आहेत.
महापालिका आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी या बँकेत पैसे ठेवण्याचा निर्णय योग्य होता असे म्हंटल आहे. पैसे सुरक्षित असल्याचं स्पष्टीकरण त्यांनी दिलंय.
दुसरीकडे नाशिक महानगरपालिकेलाही फटका बसलाय. कारण २२ ऑनलाइन नागरी सुविधांचे पैसे थेट येस बँकेत जमा होत होते. जवळपास ६० ते ७० कोटी रुपये येस बँकेत आहेत. काही वर्षांपूर्वी एसबीआय सोबतचे व्यवहार थांबवून येस बँकेशी व्यवहार सुरू केले होते.
येस बँकेत पैसे ठेवण्याच्या मुद्यावरुन राजकारण तापलंय. त्यातून काय साध्य होणार हा प्रश्न असला तरी किमान करदात्या नागरिकांचे पैसे बुडू नयेत हीच अपेक्षा.