मुंबई : संपूर्ण देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी देशभर २१ दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. पण या लॉकडाऊनमध्येही येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्याचे आरोपी वाधवान ब्रदर्स व्हीव्हीआयपी पासने महाबळेश्वरला गेल्याचं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे.
धक्कादायक म्हणजे महाराष्ट्राचे प्रधान सचिव अमिताभ गुप्ता यांच्या शिफारसीनंतर वाधवान कुटुंबाला ५ गाड्यांमधून खंडाळ्याहून महाबळेश्वरला जाण्याची परवानगी देण्यात आली. या पत्रामध्ये अमिताभ गुप्ता यांनी वाधवान यांना कौटुंबिक मित्र असल्याचं सांगितलं आहे.
श्रीमंतांसाठी महाराष्ट्रात लॉकडाऊन नाही का? या गोष्टी कोणाच्या आदेशाने आणि आशिर्वादाने झाल्या आहेत, याचं उत्तर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी द्यावं, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही या प्रकरणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. 'येस बँक आणि डीएचएफएल घोटाळ्यातले आरोपी वाधवान यांच्यावर सीबीआयने अजामिनपात्र वॉरंट जारी केलं आहे. वाधवान ब्रदर्सना सीबीआयकडे देण्याऐवजी महाराष्ट्र सरकार यांनी व्हीव्हीआयपी ट्रीटमेंट देत आहे. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रकरणी स्पष्टीकरण द्यावं', अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली आहे.
दुसरीकडे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वाधवान कुटुंबाला देण्यात आलेल्या व्हीव्हीआयपी पासची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. हे प्रकरण समोर आल्यानंतर वाधवान कुटुंबाला स्थानिक पोलिसांनी महाबळेश्वरमध्ये क्वारंटाईन करुन ठेवलं आहे. वाधवान कुटुंबातले २३ सदस्य महाबळेश्वरला गेले होते.
वाधवान कुटुंबातील 23 लोकांना खंडाळा ते महाबळेश्वर यांना जाण्याची परवानगी कशी मिळाली याची चौकशी करणार.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 9, 2020
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) April 9, 2020
डीएचएफएल आणि येस बँक घोटाळ्याप्रकरणी वाधवान ब्रदर्सना जामीन मिळाला आहे. ईडी आणि सीबीआयकडून येस बँक प्रकरणात डीएचएफएलच्या भूमिकेची चौकशी केली जात आहे. यामध्ये ३,७०० कोटींची देवाणघेवाण चौकशीच्या फेऱ्यात आहे. डीएचएफएलने येस बँकेकडून कर्ज घेण्यासाठी बँकेचे संस्थापक राणा कपूर यांच्या कुटुंबाला ६०० कोटी रुपये लाच दिल्याचा आरोप चौकशी करणाऱ्या यंत्रणांनी केला आहे.