पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडकरानो आता राँग साईडने जाणे चांगलेच महागात पडणार आहे. राँग साईडने जाण्याचे धाडस तुम्ही केले तर 1000 रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवास भोगावा लागणार आहे.
आता जर तुम्ही पिंपरीत राँग साईडनं गाडी घातलीत तर खिसा रिकामा करण्याची तयारी ठेवा... पिंपरी चिंचवड शहराचे पाहिले पोलीस आयुक्त म्हणून नियुक्त झालेल्या आर के पद्मनाभन यांनी शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत.
हिंजवडीमध्ये 'वनवे'चा प्रयोग सुरू केल्यानंतर आता त्यांनी शहरातली वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न सुरू केलाय. त्याचाच एक भाग म्हणून त्यांनी आता राँग साईडने गाडी आणल्यास 1000 हजार रुपये दंड आणि सहा महिने तुरुंगवास अशी अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेत. पहिल्यांदा दंड आकारला जाईल, पुन्हा त्याच व्यक्तीनं राँग साईडला गाडी घातल्यास थेट तुरुंगातच रवानगी केली जाणार आहे, अशी माहिती आयुक्त आर के पद्मनाभन यांनी दिलीय.
नागरिकांमध्ये याबद्दल संमिश्र प्रतिक्रिया आहेत. हजार रुपयांचा दंड जरा जास्तच होतो, असं नागरिकांचं म्हणणं आहे.
बेशिस्त वाहन चालकांमुळे होत असलेले अपघात वाहतुकीची समस्या यावर तोडगा काढणं हे पुणे-पिंपरीसाठी अत्यावश्यक आहे. त्यावर हे उपाय किती उपयुक्त ठरतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.