खासगी मालकीच्या वाहनांवर पोलीस लिहिणे बेकायदेशीर

आता खासगी गाड्यांवर पोलीस असं लिहिणे किंवा स्टिकर लावणे महागात पडणार आहे. मुंबई हायकोर्टाने यावर निर्णय दिला आहे.

Updated: Jul 1, 2019, 09:56 PM IST
खासगी मालकीच्या वाहनांवर पोलीस लिहिणे बेकायदेशीर title=

कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई : आता खासगी गाड्यांवर पोलीस असं लिहिणे किंवा स्टिकर लावणे महागात पडणार आहे. मुंबई हायकोर्टाने यावर निर्णय दिला आहे. पोलीस कर्मचाऱ्यांच्या खासगी गाडीवर पोलीस असं लिहिलेलं असतं किंवा स्टिकर लावलेला असतो. तसेच पोलिसांचा लोगो देखील असतो. यावर याआधीच बंदी आहे, आणि असे करणे बेकायदेशीर असल्याचं हायकोर्टाने म्हटलं आहे.

तुम्ही अनेक वेळा पाहिलं असेल, पोलिसांच्या गाड्यांवर, बाईकवर पोलिस लिहिलेलं असतं, त्यावरून हे लक्षात येतं की ही पोलिसांची गाडी आहे. मोठ्या शहरांमध्ये गाडीवर पोलीस लिहिलेलं महत्वाचं ठरतं. 

पण पोलिस खात्याची गाडी नसताना असं मानचिन्ह किंवा पोलिसांचा लोगो लावणे हे बेकायदेशीर आहे. पण तरी देखील लोक आपल्या खासगी गाडीवर देखील असं लिहून किंवा मानचिन्ह लावलतात, यामुळे निश्चितच नियमांची पायमल्ली होते. पोलीस कर्मचारी देखील असं करताना दिसून येतात.

ठाण्यातील सत्यजित शहा यांनी याविरोधात मोहिम उघडली आहे, या प्रकारे बेकायदेशीरपणे पोलिसांच्या गाडीवर स्टिकर लावणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करणारी याचिका त्यांनी दाखल केली होती. यावर सुनावणी करताना कोर्टाने सांगितलं, असे स्टिकर लावणे बेकायदेशीर आहे, तसेच नियम तोडल्यास कारवाई होवू शकते.

खरं तर महाराष्ट्र मोटर वाहन अधिनियमच्या कलम १३४ प्रमाणे असे स्टिकर लावण्यावर कारवाई करण्याची तरतूद आहे. पण कारवाई केली जात नाही. याविषयी सत्यजित शहा हे कायदेशीर लढाई लढत आहेत.

लोकांच्या देखील अशाच भावना आहेत की, अशा प्रकारचे स्टिकर लावणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. कारण पोलीस लिहिलेल्या गाडीचा वापर एखादा गुन्ह्यात देखील वापरली जावू शकते. यामुळे  पोलीस कर्मचाऱ्यांच्या खासगी गाड्या नव्हे, तर फक्त पोलीस खात्याच्या मालकीच्या गाड्यांवरच असं स्टिकर लावण्याची परवानगी असली पाहिजे.