जागतिक वन्यजीव दिवस : दोन महिन्यांत २१ वाघांचा मृत्यू

आज ३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... चालू वर्षांच्या सुरुवातीच्या अवघ्या दोन महिन्यातच तब्बल २१ वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आलीय. यानंतर वाघ स्थलांतरासाठी ठोस निर्णय आवश्यक असल्याचा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला आहे. 

Updated: Mar 3, 2018, 01:16 PM IST
जागतिक वन्यजीव दिवस : दोन महिन्यांत २१ वाघांचा मृत्यू  title=

आशिष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर : आज ३ मार्च... जागतिक वन्यजीव दिवस... चालू वर्षांच्या सुरुवातीच्या अवघ्या दोन महिन्यातच तब्बल २१ वाघांचा मृत्यू झाल्याची आकडेवारी पुढे आलीय. यानंतर वाघ स्थलांतरासाठी ठोस निर्णय आवश्यक असल्याचा अभिप्राय तज्ज्ञांनी दिला आहे. 

देशात वाघ मृत्यूची पुढे आलेली ताजी आकडेवारी वन्यजीवप्रेमींच्या चिंता वाढविणारी ठरली आहे. देशभर मागील दशकात 'वाघ वाचवा' अभियान धडाक्यात राबविण्यात आले. त्याची फळे पुढे येत असतानाच आता मध्यप्रदेश, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक, उत्तराखंड राज्यातून पहिल्या दोन महिन्यात वाघ मृत्यूची आणि अवयव गवासल्याची आकडेवारी धोक्याचा इशारा समजली जात आहे.

वाघांचे हे मृत्यू अधिक संख्येने 'नैसर्गिक' गृहीत धरले तरी उर्वरित वाघ मृत्यूची ठोस कारणे वनविभागाकडे झुंज आणि शिकार अशी आहेत. एवढ्या मोठ्या संख्येत वाघ मृत्यू होत असताना हे मृत्यू संरक्षित जंगलाच्या बाहेर असल्याचे स्पष्ट झाले आहे. याचा अर्थ ज्या वाघांना आपल्या हद्दीच्या बाहेर जाणे क्रमप्राप्त आहे त्यांचा मृत्यू अटळ असल्याचे बोलले जाते. 

दुसरीकडे रेल्वे, नवे महामार्ग आणि सिंचन कालवे यामुळे वाघांचे नैसर्गिक भ्रमणमार्ग बाधित झाले आहेत. काही भागात तर जंगल नसलेल्या ठिकाणी वाघांचे अस्तित्व आढळून आले आहे. ज्या भागात अधिक संख्येने वाघ आहेत त्यांना वाघ नसलेल्या जंगलात स्थलांतरित करण्यासाठी ठोस धोरण आखून त्यावर अंमलबाजवणी करण्याची गरज व्यक्त करण्यात येत आहे. 

जगभर कुठे नसेल एवढा समृद्ध वने आणि वन्यजीव वैविध्य असलेला हा भाग त्यांच्या सर्व गुणांसह संवर्धन करणे आपल्या सर्वांपुढील मोठे आव्हान आहे. वन्यजीवांचा हा वारसा टिकविण्यासाठी वन्यजीव-स्नेही विकास धोरण आखण्याची गरज या निमित्ताने व्यक्त झाली आहे.