मुंबई : कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. देशालाही याची झळ बसली असून पंतप्रधान मोदींनी गुरुवारी देशाला संबोधित करत २२ मार्चला जनता कर्फ्यूची घोषणा केली आहे. सकाळी ७ ते रात्री ९ वाजेपर्यंत घराच्या बाहेर न पडण्याचं आवाहन पंतप्रधान मोदींनी देशवासियांना केलं आहे. कोरोनामुळे कामावर प्रभाव झाला असल्यास त्यांचा पगार कापू नका असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान कामगार आयुक्त डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी या पार्श्वभुमीवर महत्वाचा निर्णय दिला आहे. कामगारांची पगारकपात न करण्याबाबतचा आदेश त्यांनी आस्थापनांना दिला आहे. एक जाहीर पत्रक काढून त्यांनी ही माहिती दिली आहे.
सर्वांनी घरी राहण्याचे आवाहन सरकारने केले आहे. पण कामगारांना जबरदस्ती कामास बोलावण्याचे तसेच कामावर न आल्यास पगार कापण्याच्या घटना समोर येत आहेत. या पार्श्वभुमीवर कोणत्याही कामगारावर अशाप्रकारे पगार कपातीची अथवा कामावरुन काढून टाकण्याची कारवाई करु नये असे या आदेशात म्हटले आहे. यामुळे नोकरदार वर्गाची आर्थिक स्थिती तर ढासळेलच सोबत मानसिक स्थितीवर देखील परिणाम होईल.
त्यामुळे कामागारांना कामावरुन काढणाऱ्या तसेच पगार कापणाऱ्या आस्थापनांच्या मालकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल अशा इशारा देखील यातून देण्यात आला आहे.