भिवंडीत पोलीस-वकील यांच्यात बाचाबाची...

भिवंडी न्यायालयाची संरक्षण भिंत सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलयाच्या वाढीव जागेसाठी परवानगी न घेता तोडण्यात आल्याने वकील संघटना आणि भिवंडी पश्चिम विभागाच्या एसीपीमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे.

Updated: Jun 9, 2017, 04:14 PM IST
 भिवंडीत पोलीस-वकील यांच्यात बाचाबाची...  title=

ठाणे : भिवंडी न्यायालयाची संरक्षण भिंत सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलयाच्या वाढीव जागेसाठी परवानगी न घेता तोडण्यात आल्याने वकील संघटना आणि भिवंडी पश्चिम विभागाच्या एसीपीमध्ये बाचाबाची झाल्याची घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार भिवंडी पश्चिम विभागातील सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलयाच्या  नूतनीकरणाचे काम सुरु असून यासाठी लाखो रुपये खर्च करण्यात येत आहे. मात्र सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलयालाचा विस्तार वाढल्याने जागा कमी पडू लागली. यामुळे न्यायालयाची जागा आपलीच समजून पोलिसांनी परवानगी न घेताच बुधवारी रात्रीच्या सुमाराला सदरची भिंत तोडल्याने आज सकाळी वकील संघटना आणि एसीपी नरेश मेघराजानी यांच्यामध्ये बाचाबाची झाल्याने न्यायालयाच्या परिसरात वातावरण तंग झाले होते.

याबाबत एसीपी नरेश मेघराजानी यांच्याशी संपर्क साधला असता. भिंत तोडताना उलट रात्रीच्या वेळी  वकिलांनीच माझ्याशी हुज्जत घातली होती. ही जागा पोलीस विभागाची असल्याने या जागेवर आमचा अधिकार आहे. मात्र परवानगी घेवून भिंत तोडायला पाहिजे होती. अशी कबुली देत. तोडलेली भिंत पुन्हा बांधून देणार असून नंतर परवानगी घेऊनच सहाय्यक पोलीस आयुक्त कार्यलयालाचा विस्तार करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

तर दुसरीकडे न्यायालयात येणाऱ्या पक्षकारांसाठी वाहनांच्या पार्किंगसाठी आरक्षित जागेवर पोलीस प्रशासन  जबरदस्तीने कब्जा करीत असल्याच्या कारणाने भिवंडी न्यायालयातील वकील संघटनाने विरोध दर्शविला  असून पोलिसांचा निषेध करीत काम बंद करण्याचा इशाराही दिला आहे. तर या घटनेप्रकरणी कायदेशी तक्रार करणार असल्याचे वकील संघटनेचे अध्यक्ष एस. एस. बोरकर यांनी सांगितले.