NCP विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार का? अजित पवारांच्या उत्तराने पिकला हशा

Will NCP Claim Vidhan Parishad Opposition Leader Post: ठाकरे गटाच्या नेत्या मनिषा कायंदे यांनी शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केल्याने ठाकरे गटाकडून आता विधानपरिषदेचं विरोधी पक्षनेते पदही जातं की काय अशी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये सुरु झाली असून त्यावर अजित पवारांनीही प्रतिक्रिया नोंदवली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Jun 19, 2023, 01:45 PM IST
NCP विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार का? अजित पवारांच्या उत्तराने पिकला हशा title=
अजित पवारांनी पत्रकारांच्या प्रश्नाला दिलं उत्तर

Will NCP Claim Vidhan Parishad Opposition Leader Post: उद्धव बाळासाहेब ठाकरे (Uddhav Thackeray Group) गटातील विधानपरिषदेच्या सदस्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी रविवारी ठाण्यामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (CM Eknath Shinde) उपस्थितीमध्ये शिवसेनेत (शिंदे गटात) जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसल्याचं सांगितलं जात आहे. मात्र कायंदेंनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र केल्याने विधानपरिषदेमधील विरोधीपक्ष नेतेपदही ठाकरे गटाकडून जाणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे. असं असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने विधानपरिषदेच्या सदस्यांची बैठक बोलावल्याची माहिती समोर आल्याने राष्ट्रवादी विरोधी पक्षनेते पदावर दावा सांगणार की काय अशी शंका व्यक्त केली जात आहे. त्याच आता राज्याचे विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांनी सूचक विधान केलं आहे.

बैठकीचं कारण काय?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विधानपरिषदेमधील विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगणार का असा प्रश्न अजित पवार यांना मुंबईमध्ये पत्रकारांनी विचारला. "आमची बैठक ही फार आधीच ठरलेली आहे. याचा आणि त्याचा काहीही संबंध नाही," असं अजित पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. या बैठकीसंदर्भात बोलताना अजित पवारांनी, "पावसामुळे आम्हाला 9 तारखेला नगरला सभा घेता आली नाही. आम्ही ती सभा 21 तारखेला ठेवली होती. अशापद्धतीने त्याच पार्श्वभूमीवर आमची ही बैठक आहे," असं अजित पवार म्हणाले. या बैठकीमध्ये विधानसभा, विधानपरिषदेच्या नियोजनासंदर्भातील चर्चा होईल असे संकेत अजित पवारांनी दिले.

...अन् पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला

राष्ट्रवादी दावा करणार का विधानपरिषदेवर? असा प्रश्न अजित पवारांना पुन्हा एका पत्रकाराने विचारला. यावर अजित पवारांनी आपल्या खास शैलीमध्ये, "अरे बाबा आमची महाविकास आघाडी आहे. लगेच बातम्या चालवू नका. आम्ही शांतपणे विचार करु. आम्ही एक आहोत," असं म्हटलं. पुढे आपल्या भूमिकेबद्दल बोलताना अजित पवारांनी, "विधानसभा, विधानपरिषदेत जेव्हा विरोधी पक्षनेता पद देण्याची वेळ येते तेव्हा ज्यांच्या जागा सर्वात जास्त त्यांना ते विरोधीपक्ष नेते पद देतात. 2014 ला आम्ही 41 निवडून आलो होतो आणि काँग्रेस 42 निवडून आलो होतो तरी 5 वर्ष काँग्रेसकडे विरोधी पक्षनेतेपद होतं. शेतकरी कामगार पक्षाचे तीन सदस्य, स्वर्गीय आबासाहेब देशमुख आणि इतर दोघे आमच्या पाठिंब्याने निवडून आले होते. मी म्हटलं होतं की 41 आणि 3 असे 44 झाले त्यावेळेस अध्यक्ष हरीभाऊ बागडे म्हणाले, ज्या पक्षाचे सर्वात जास्त सदस्य त्यांना मी विरोधीपक्ष नेता म्हणून जाहीर करणार. त्यांनी तसं केलं होतं," अशी आठवण अजित पवारांनी सांगितली. त्यानंतर अजित पवारांनी, "तुम्ही जे सांगताय त्याबद्दल कोणताही विचार केला नाही. मात्र आता तुम्ही एक गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर आम्ही नक्कीच विचार करु," असं अजित पवार विधानपरिषदेच्या विरोधी पक्षनेते पदाबद्दल बोलल्यानंतर पत्रकारांमध्ये एकच हशा पिकला.

पाण्याबद्दल व्यक्त केली चिंता

यावेळस अजित पवारांनी पावसाळा लांबल्याने पाण्याची टंचाई निर्माण होण्याची भीती व्यक्त केली आहे. पिकं पाण्याला आली आहेत मात्र धरणांमध्ये पाणी नसल्याने पिकांना पाणी देता येत नाही. जूनमध्ये अनेक ठिकाणी टँकरने पाणी पुरवठा करण्याची मागणी होताना दिसत आहे. पुणे जिल्ह्यात काही ठिकाणी टँकरची मागणी होऊ लागली आहे. याचा मोठा फटका साखर कारखान्यांना बसणार आहे," असं अजित पवार म्हणाले.