कपिल राऊत, झी मीडिया, ठाणे : शिवसेनेच्या स्थानिक नेत्याच्या खूनामुळे शहापूर आणि परिसर हादरुन गेला होता. या खुनाचा छडा लावण्यासाठी पोलीस कसून प्रयत्न करत होते. हा खून राजकीय आहे का, या दिशेनं तपास सुरू असताना अचानक ट्विस्ट आला. आणि समोर आलं एक धक्कादायक सत्य.
20 एप्रिल रोजी शहापूरजवळचं देवचरीच्या जंगलात शिवसेनेचे माजी उपतालुकाप्रमुख शैलेश निमसेंचा मृतदेह अर्धवट जळलेल्या अवस्थेत मिळाला होता. राजकीय वैमनस्यातून ही हत्या झाली असावी असा प्राथमिक अंदाज होता. त्या दृष्टीनं पोलिसांची चक्रं फिरू लागली. पण एक धक्कादायक सत्य समोर आलं. शैलेश निमसे यांच्या हत्येची सुपारी त्यांची पत्नी साक्षी निमसेनंच दिली होती.
सुरुवातीला या खुनाचा तपास करताना पोलिसांची दिशाभूल करण्यात आली होती. ही हत्या राजकीय असल्याचा दावा करत काही संशयित नावंही पोलिसांना सांगण्यात आली होती... पण अखेर सीसीटीव्ही आणि इतर कागदपत्रांच्या आधारे ठाणे पोलिसांनी या खुनाचा छडा लावला.