बोईसर मतदारसंघात कोण मारणार बाजी?

बहुजन विकास आघाडी पुढे शिवसेनेचं आव्हान

Updated: Oct 23, 2019, 10:12 PM IST
बोईसर मतदारसंघात कोण मारणार बाजी? title=

मुंबई : बोईसर विधानसभेच्या जागेवर तिसऱ्यांदा निवडून येण्यासाठी बहुजन विकास आघाडी स्वप्न बघत असली तरी त्यांच्यापुढे बविआतून शिवसेनेत गेलेले आमदार विलास तरे आणि भाजपचे बंडखोर उमेदवार संतोष जनाठे यांचे आव्हान आहे. तीनही उमेदवारांचे आपापले प्रभावक्षेत्र असून शिवसेना आणि बविआमधील नाराज कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर निवडणुकीचा निकाल अवलंबून आहे. २००९ आणि २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून बहुजन विकास आघाडीने आमदार विलास तरे यांच्या रूपाने विजय मिळवला होता. मात्र २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडी या मतदारसंघात पिछाडीवर पडल्याचे दिसून आले. 

विलास तरे यांच्यावर एकीकडे निष्क्रियतेचा आरोप बहुजन विकास आघाडीतर्फे तसेच नागरिकांकडून करण्यात येत असताना त्यांनी केलेल्या पक्षांतरामुळे शिवसेनेतील काही मंडळी दुखावली गेली आहे. असे असले तरी मृदूभाषी असलेला विलास तरे यांचा मनोर, सफाळे पट्टय़ातील गावांमध्ये असलेल्या संपर्कामध्ये परिवर्तन किती होते यावर त्यांचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. 

शिवसेनेची बोईसर, मनोर आणि सफाळेच्या पश्चिमेच्या भागांत संघटनात्मक बांधणी असून त्याचा कितपत लाभ तरे यांना मिळतो हे पाहण्याजोगे आहे. शिवसेनेने बोईसरची जागा प्रतिष्ठेची केली असून या जागेकडे वरिष्ठांचे लक्ष आहे.