मुंबई : राज्यात जल जीवन मिशन अंतर्गत सार्वजनिक वित्तीय प्रबंधन सेवा (PFMS) प्रणाली आणि त्यानंतर संगणकीय IMIS प्रणालीवरील नोंदी घेण्यात आल्या. यात तब्बल १४२ कोटीची तफावत आढळून आल्याची कबुली राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलीय.
विधानसभेत भाजप आमदार श्वेता महाले यांनी तारांकित प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला दिलेल्या लेखी उत्तरात पाणी पुरवठा मंत्र्यांनी ही माहिती दिली. जानेवारी २०२२ च्या सुमारास ही बाब निदर्शनास आल्याचे त्यांनी सांगितले.
पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने जीवन प्राधिकरणासह सर्व संबंधित यंत्रणांना पत्र पाठविले आहे. तसेच, राज्य पाणी व स्वच्छता मिशन स्तरावरुन संबंधित यंत्रणांसमवेत वेळोवेळी व्हिडिओ कॉन्फरन्सदवारे बैठक आयोजित करुन तफावतीबाबत माहिती मागविण्यात आली आहे. तसेच, जिल्हा यंत्रणांद्वारे झालेला प्रत्यक्ष खर्च, PFMS वरील खर्च व IMIS वरील खर्च यांचा ताळमेळ घालण्यात येत आहे.