अंतर्गत जलवाहिनी कधी पूर्ण होणार ? जालनाकर संतापले

नियमित पाणीपुरवठा कधीपासून सुरु होणार असा जालनाकरांना प्रश्न

Updated: Jan 28, 2020, 06:08 PM IST
अंतर्गत जलवाहिनी कधी पूर्ण होणार ? जालनाकर संतापले title=

नीतेश महाजन, झी मीडिया, जालना : जालना शहरात सध्या अंतर्गत जलवाहिनीचं काम सुरु आहे. गेल्या तीन वर्षात या योजनेचं 90 टक्के काम पूर्ण झालंय.मात्र जलकुंभ उभारणीचं काम धिम्या गतीने सुरु असल्याने शहरातील वेगवेगळ्या भागात अजूनही नियमित पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे जालन्यातील नागरीकांना नियमित पाणीपुरवठा कधीपासून सुरु होणार असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होतो.

जालना शहरात याआधी निजामकलीन पाईपलाईनने पाणीपुरवठा केला जात होता.पण पाईपलाईनला सतत गळती लागत असल्यानं सध्या शहरात नवीन अंतर्गत पाईपलाईनचं काम सुरु आहे. 

3 वर्षांपासून या पाईपलाईनचं काम सुरू आहे.त्यामुळे शहरातील नवीन जालना भागात पाणी पुरवठ्यात सातत्य नाही.शहरात नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करण्यासाठी 9 जलकुंभ उभारण्यात येणार आहे.मात्र सध्या 3 ते 4 जलकुंभच असल्याने नियमित पाणीपुरवठा करण्यात अडचण येऊ लागलीय.

अंतर्गत पाईपलाईनचं काम शहरातील जुना जालना भागात पूर्ण झाल्याने या भागात आता नियमित पाणीपुरवठा होणार आहे.त्यामुळे किमान 2 ते 3 दिवसांनी पाणीपुरवठा व्हावा अशी महिलांची अपेक्षा आहे.

शहरात सध्या जलकुंभ उभारणीसाठी नगरपालिका जोमाने कामाला लागलीय. त्यामुळे येत्या मार्च अखेरीस 6 जलकुंभांचं काम पूर्ण होईल असा विश्वास नगराध्यक्षा संगीता गोरंटयाल यांनी व्यक्त केलाय. अंतर्गत पाईपलाईनचं काम 90 टक्के पूर्ण झालं असून शहर वासीयांना 2 ते 3 दिवसाआड पाणीपुरवठा केला जाईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलाय.

गेल्या 3 वर्षांपासून सुरु असलेलं अंतर्गत जलवाहिनीचं काम आता काही महिन्यात संपणार आहे.मात्र जोपर्यंत सर्व 9 जलकुंभांचं  काम पूर्ण होत नाही तोपर्यंत जालना शहरातील नागरिकांना पाणीपुरवठा करणं शक्य नाही.त्यामुळे जलकुंभ उभारण्याच्या कामात आता जालना पालिकेने आघाडी घेतलीय.हे काम लवकर पूर्ण होऊन पाण्याच्या त्रासातून कायमची सुटका व्हावी अशीच नागरिकांची अपेक्षा आहे.