वनमंत्री संजय राठोड यांनी आतापर्यंत काय काम केलं?

पूजा चव्हाण ( Pooja Chavan) मृत्यू प्रकरणात वादात सापडलेले संजय राठोड (Sanjay Rathod) हे राज्याचे वनमंत्री आहेत.  

Updated: Feb 27, 2021, 07:01 PM IST
वनमंत्री संजय राठोड यांनी आतापर्यंत काय काम केलं?  title=

अरूण मेहेत्रे, पुणे : पूजा चव्हाण ( Pooja Chavan) मृत्यू प्रकरणात वादात सापडलेले संजय राठोड (Sanjay Rathod) हे राज्याचे वनमंत्री आहेत. वनमंत्री म्हणून त्यांनी आजवर काय स्वरूपाचं काम केलंय याविषयी आता प्रश्न उपस्थित होत आहेत. पाहुयात त्यावरचाच स्पेशल रिपोर्ट. (What did do Forest Minister Sanjay Rathod ?)

वन्यजीव आणि मनुष्य यांच्यातील संघर्ष किती टोकाला गेलाय हे सांगणारी ही आकडेवारी आहे. असं असताना महाराष्ट्राचे वनमंत्री संजय राठोड करताहेत तरी काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. खात्यातील अधिकारी, कर्मचा-यांच्या बदल्या, तसंच तेंदुपत्ता, लाकूड आदींचे लिलाव, यामध्येच वन मंत्र्यांना अधिक रस असल्याचा आरोप होत आहे. मंत्रिपदाचा पदभार स्वीकारताच याबाबतचे सर्व अधिकार संजय राठोड यांनी स्वतःकडे घेतले. बदल्यांचे अधिकार हाती घेण्याबाबतचं 38 कलमी पत्रकच त्यांनी काढलं होतं असं सांगितलं जातंय. पर्यावरण संरक्षणबाबत वनमंत्री संजय राठोड अत्यंत असंवेदनशील असल्याचा आरोप होत आहे. 

आजघडीला राज्यातील शेकडो वनरक्षक आणि वन कर्मचा-यांच्या बदल्या रखडलेल्या आहेत. वरिष्ठ अधिका-यांची कित्येक पदं रिक्त आहेत. वन परिक्षेत्र अधिका-यांच्या बदल्या केल्या गेल्या, मात्र त्यांना अजूनही नियुक्ती देण्यात आलेली नाही. या सगळ्यात संबंधितांचे आर्थिक हितसंबंध दडले असल्याची चर्चा आहे. त्याचप्रमाणे वृक्ष लागवड असो वा वृक्ष संवर्धन या कामात वनमंत्र्यानी विशेष काही केल्याचं ऐकिवात नाही. मुळात संजय राठोड हे राज्याचे वनमंत्री असल्याचं, जनतेला पूजा चव्हाण प्रकरणाच्या निमित्ताने कळलं ही बाब दुर्दैवी म्हणावी लागेल. 

वनसंपदा म्हणजे त्यात वन्य जीव आले. वृक्षवल्ली आली त्याप्रमाणे नैसर्गिक स्त्रोतही आले. या साऱ्याच जतन करणे, त्यात वाढ करणे ही वन विभागाची जबाबदारी मात्र आपल्या मंत्र्यांना त्यात कितपत यश मिळाले हा खरोखरच संशोधनाचा विषय ठरू शकतो.