मुंबई: गेल्या काही दिवसांत पावसानं दडी मारली होती. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये तर बळीराजावर तिसऱ्यांदा पेरणीचं संकट ओढऴलं आहे. अशा परिस्थितीमध्ये बळीराजाला दिलासा देणारी बातमी आहे. आज आणि उद्या दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.
येत्या 24 तासांमध्ये महाराष्ट्रात काही भागांत मुसळधार पावसाची शक्यता आहे. कुलाबा वेधशाळेनं यासंदर्भात इशारा दिला आहे. आज आणि उद्या उत्तर कोकण म्हणजे मुंबई, ठाणे, पालघरमध्ये एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.
यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आलाय. तर कोकण, उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातल्या काही भागांमध्ये यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने वर्तविलेल्य अंदाजानुसार आज सलग दुसऱ्या दिवशीही भंडारा जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. काल जिल्हाभर पाऊस पडला असून रात्रीच्या सुमारास रिमझिम पाऊस आला होता, त्यानंतर पावसाने विश्रांती घेतली होती.
अखेर आज दुपारनंतर पुन्हा पावसाने सुरूवात केली आहे. तर शेतकऱ्यांची धान पिके वाळत चालली असताना या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळेल हे मात्र निश्चित आहे. राज्यातल्या अनेक भागांत आज, उद्या मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यवतमाळमध्ये रेड अलर्ट तर उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात यलो अलर्ट हवामान विभागाकडून देण्यात आला आहे.