मुंबई : राज्यात मान्सूनचं आगमन झालं आहे. काही ठिकाणी पेरणीची लगबगही सुरू झाली आहे. मात्र संपूर्ण महाराष्ट्रात अजून म्हणावा तसा पावसाचा जोर नसल्याने पेरण्यांची घाई करू नये असं शेतकरी बांधवांना सांगण्यात आलं आहे. मुंबईतही पावसाने हजेरी लावली आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रा पुढचे तीन दिवस मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति मुसळधार पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रत्नागिरीमध्ये पुढचे तीन दिवस अति मुसळधार पाऊस असेल असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने 24 आणि 25 तारखेला यलो अलर्ट दिला आहे.
मुंबईसह उपनगरात पावसाच्या सरी बरसल्याने हवेत गारवा निर्माण झाला आहे. उपनगरातही पाऊस अधूनमधून हजेरी लावत आहे. मात्र म्हणावा तसा अजून आला नाही. त्यामुळे पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.
विदर्भातही पावसाने चांगलीच हजेरी लावली. काही ठिकाणी पावसामुळे नुकसानही झालं. तर घरांमध्ये पाणीही गेलं. अमरावतीमध्ये ढगफुटीसदृश्य झालेल्या पावसाने लोकांची तारांबळ उडाली होती.