Maharashtra Weather Update: राज्यात पावसाचा जोर ओसरला आहे. मुंबईसह कोकणात आता पावसाने थोडी उघडीप दिली आहे. मात्र काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाचा पाऊस होणार आहे. 13 जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात मात्र पावसाची शक्यता कमीच असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज रविवारी 13 जिल्ह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. तर, सोमवारपासून सलग तीन दिवस पाऊस उघडीप देणार आहे. फक्त पुणे ते रायगडच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्याचबरोबर, कोकणातील पालघर, रायगड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. धुळे, जळगाव, नाशिक जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे. त्याचबरोबर, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात जोरदार पावसाची शक्यता आहे.
विदर्भातील भंडारा, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर रविवारी रायगड,पुणे, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट देण्यात आला आहे. तर, उर्वरित राज्यात पावसाचा जोर कमी असणार आहे.. पुण्यात येत्या 48 तासांत मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळणार आहे.
बंगालच्या खाडीत तयार झालेले अति तीव्र कमी दाबाचे क्षेत्र झारखंड, मध्य प्रदेशवरून राजस्थानकडे पुढे गेले आहे. त्यामुळे विदर्भ, उत्तर मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रातील पावसाचा जोर कमी झाला आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.