मुंबईत संततधार तर कोकणात मुसळधार

धनत्रयोदशीवर पावासाचं सावट 

Updated: Oct 25, 2019, 11:06 AM IST
मुंबईत संततधार तर कोकणात मुसळधार  title=

मुंबई : मुंबईसह महाराष्ट्रात परतीचा पाऊस पडत आहे. ऑक्टोबर महिना संपत आला, दिवाळी आली तरी अजून पाऊस थांबण्याचं नाव घेत नाही आहे. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर ही या पावसाचं सावट होतं. आता ते दिवाळीवर देखील असणार आहे. 

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे रत्नागिरी सिंधुदूर्गात मुसळधार पाऊस बरसत आहे. सिंधुदूर्गातल्या कणकवलीत मध्यरात्रीपासून जोरदार पाऊस सुरू आहे. कमी दाबाच्या पट्यामुळे पुढचे 24 तास कोकणात असाच पाऊस होणार असल्याचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं व्यक्त केला आहे. कणकवलीसोबत देवगड, वैभववाडीत सुद्धा जोरदार पाऊस होतोय. रत्नागिरीत, राजापूर आणि किनारपपट्टी भागात हा पाऊस होतोय.

तसेच पुणे, अहमदनगर, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि बीडमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असून राज्यात पुढचे तीन दिवस पावसाचेच राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागात 27 ऑक्टोबरपर्यंत हलक्या आणि मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे. दिवाळीमध्ये देखील पाऊस कोसळत असल्यामुळे बच्चे कंपनींची निराशा झाली आहे. फटाके फोडण्यासाठी पाऊस अडथळा घालत आहे. 

आज धनत्रोयदशीअसून या दिवसावर पावसाचं सावट आहे. बाजारपेठात पावसामुळे चिखल झाला आहे. याचा त्रास सामान्यांना होत आहे. सणाच्या अगोदर पावसाचा मारा झाल्यामुळे फुल मार्केट आणि भाजी मार्केटमध्ये दर वाढले आहेत.