महादेवाचे आद्य ज्योतिर्लिंग संकटात; मंदिराच्या आवारात पाण्याचे तलाव

अतिक्रमण, काँक्रिटीकरणामुळे गंभीर परिस्थिती

Updated: Jul 13, 2019, 06:48 PM IST
महादेवाचे आद्य ज्योतिर्लिंग संकटात; मंदिराच्या आवारात पाण्याचे तलाव title=

योगेश खरे, झी मीडिया, नाशिक : त्र्यंबकेश्वरात दोन दिवसांत दीडशे मिलिमीटर पाऊस पडल्याने त्र्यंबकेश्वर संकटात आहे. मंदिराच्या आवारामधे पाण्याचे तलाव झाल्याने वास्तूरचनेवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. 

साडे तीनशे वर्षांपूर्वीचे हे त्र्यंबकेश्वराचे पेशवेकालीन मंदिर म्हणजे आद्य ज्योतिर्लिंग. महादेवाचे दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक त्र्यंबकनगरीत येतात. पण, आता हे मंदिर पाण्याखाली जाईल की काय, अशी भीती आहे. कारण ब्रह्मगिरीवरुन येणारे पाणी थेट मंदिरात शिरू लागले आहे.  

पुढच्या श्रावण महिन्यात ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा सुरू होईल. त्यासाठी हजारो भाविक दर्शनासाठी येतात. अशावेळी मोठा धोका निर्माण झाला आहे.

हे सगळं मोठ्या प्रमाणात झालेल्या काँक्रिटीकरणामुळे घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. 

कमी जागेत लोकसंख्येची अधिक घनता, असा हा परिसर आहे. त्र्यंबकेश्वरमधले अतिक्रमण, काँक्रिटीकरण वाढते आहे. या सगळ्याचा ताण त्र्यंबकेश्वरवर येतो आहे. काही वर्षांपूर्वी उत्तराखंडात काय झाले, केदारनाथचं काय झाले, ते डोळ्यासमोर आहे. आताच काळजी घेऊन पावले उचलायला हवीत. नाहीतर निसर्ग एक दिवस त्याची ताकद दाखवतोच.