Washim Crime News: जावयाची दारू सुटावी यासाठी प्रयत्न करत असतानाच मेहूण्याच्या हातून गंभीर गुन्हा घडला आहे. वाशिम जिल्ह्यात ही घटना घडली आहे. यामुळं कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. दारूच्या व्यसनामुळं दोन घरं उद्ध्वस्त झाली आहेत.
दारुडा जावई बहिणीला वारंवार त्रास देत असल्याने त्याचे व्यसन सुटावे यासाठी त्यांचा मेहूणा हा जावयाची दारू सोडवण्यास नेत असताना आपसात वाद होऊन गंभीर गुन्हा घडला आहे. जावयाने मेहुण्यावर वार केला तो हल्ला परतवून लावत असताना मेहुण्याने जॅक आणि कोयत्याने वार केला यात जावई ठार झाला आहेत. वाशिम जिल्ह्यातील ही घटना आहे.
वाशिम जिल्ह्यातील अकोला - नांदेड महामार्गावरील झोडगा गावाजवळील बंद ढाब्याजवळ ही घटना घडली आहे. मृतक जावई सुभाष मापारी हे बोरी मापारी गावचे रहिवाशी असून आरोपी मेव्हणा हा नामदेव भुसारी हा वाशिम तालुक्यातील किनखेडचा रहिवाशी आहे. नामदेव भुसारी यांना जावई सुभाष डिगांबर मापारी हे वाशिम बसस्थानकाजवळील दारुच्या दुकानाजवळ भेटले होते.
आरोपी नामदेव यांनी जावयांना दारू सोडवायची असल्याचे कारण सांगून त्यांना मिनि ट्रकमध्ये बसवून मालेगाव येथे घेऊन गेले. तिथे मेव्हणा नामदेव भुसारी हे वाहन चालवत असताना मालेगाव तालु्क्यातील झोडगा गावालगत जावई सुभाष मापारी यांनी दारू सोडवण्याच्या कारणावरुन वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत असताना जावयाने मेहुण्यावर कोयत्याने वार सपासप वार केले. आरोपीने पहिल्यांदा हा वार हातावर झेलला त्यामुळं गंभीर इजा झाली नाही. जावयाने पुन्हा वार करण्याआधीच आरोपी नामदेव यांनी गाडीतील लोखंडी जॅक हातात घेवून जावयाच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. तसंच, जावयाच्या हातातील कोयता हिसकावून त्यांच्यावर कोयत्याने सपासप वार केले.
आरोपीच्या या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जावयाने जागीच प्राण सोडले. त्यानंतर त्याचा मृतदेह रस्त्याच्या बाजूला टाकून देत स्वतःहूनच मालेगाव पोलिस ठाणे गाठत गुन्हा कबूल केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात एकच खळबळ उडाली असून या हत्येचा तपास पोलीस निरीक्षक संजय चौधरी, सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वप्निल तायडे करत आहेत. दारूच्या व्यसनामुळे आज एक हत्येची घटना घडल्याने दोन घरं उध्वस्त झाली आहेत. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन अवैधरित्या विकल्या जाणाऱ्या दारूवर नियंत्रण मिळविण्याची मागणी होत आहे.